मुंबई : देशातील 10 राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ असल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या काही आठवड्यात ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याच्या सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थितीत आणखी बिकट होईल असं सांगण्यात आलं आहे.


या 10 राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात देशात 41 हजार 649 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्य परिस्थितीत देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे.


देशातील कोविड-19 परिस्थितिचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. आरोग्य विभागाकडून कोविड-19चं सर्वेक्षण आणि व्यवस्थापनासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. 


कडक निर्बंध आणण्याचा सल्ला


ज्या जिल्ह्यांमझ्ये गेल्या काही आठवड्यात पॉझिटीव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करावेत असा सल्ला देण्यात आला आहे. अशा जिल्ह्यांमध्ये लोकांच्या गर्दीवर, प्रवासावर निर्बंध आणावेत, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. वेळीच निर्बंध लागू केले नाहीत तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. 


केंद्र सरकारने म्हटलं आहे, 10 राज्यातील 80 टक्के करोनाचे रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत आहेत. त्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.


10 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं (Vaccination) प्रमाण वाढवण्याची गरजही व्यक्त करण्यात आली. खासगी हॉस्पिटलनीही पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे निर्देश राज्यांनी द्यावेत आणि त्यांना त्यासाठी सहकार्य करावं, असंही केंद्राने म्हटलं आहे.