नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या सतत वाढत आहे. भारतात सध्या साडे आठ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी साडे पाच लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 63 टक्के इतका झाला आहे. भारतातील 19 राज्यांचा रिकव्हरी रेट टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. या 19 राज्यांमध्ये लडाख 85 टक्के रिकव्हरी रेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली 80 टक्के रिकव्हरी रेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या 19 राज्यांमध्ये 19व्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचा क्रमांक आहे.


गेल्या 24 तासात भारतात 18,850 रुग्ण बरे झाले असून कोरोनातून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5,53,470 इतकी झाली आहे.



सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जितक्या लवकर कोरोना चाचण्या घेतल्या जातील, तितक्या लवकर रुग्णावर उपचार करणं शक्य होईल. म्हणूनच दररोज अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. रविवारी भारतात 2 लाख 19 हजाराहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या.


भारतात सध्या 1200 लॅबमध्ये कोविड चाचण्या करत आहेत. त्यापैकी 852 सरकारी लॅब असून 348 खाजगी लॅब आहेत.