नवी दिल्ली : जे आय़ुष्यभर सत्यासाठी लढले, ज्यांनी सत्याचं तत्वज्ञान सगळ्या जगाला शिकवलं, त्याच गांधीजींच्या समाधीस्थळावर भ्रष्टाचार सुरू होता आणि त्याची पोलखोल केली एका चिमुरडीनं. पंतप्रधान मोदींनी या चिमुरडीच्या पत्राची तात्काळ दखल घेत राजघाटावरचा भ्रष्टाचार रोखलाय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महात्मा गांधीजींची राजघाटावरची समाधी. गांधींच्या या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी चप्पल काढून जावं लागतं. त्यासाठी दोन काऊंटर्स ठेवण्यात आलेत. एक मोफत आहे तर दुस-या काऊण्टरवर चप्पल ठेवण्यासाठी नाममात्र एक रुपया शुल्क घेतलं जातं. 


गांधीजींची ही समाधी पाहण्यासाठी हश्मिताही आली होती. पंजाबमधल्या पतियाळात राहणारी 13 वर्षांची हश्मिता काही दिवसांपूर्वी आई वडिलांबरोबर दिल्लीला फिरायला आली. त्यावेळी तिनं राजघाटही पाहिला. चप्पल आणि बुटांच्या काऊण्टरवरचे कर्मचारी परदेशी लोकांकडून शंभर रुपये घेत होते.... हश्मितानं हे पाहिलं. 


पटियाळाला परत गेल्यावर हश्मितानं याविरोधात मोदींकडे तक्रार करायची ठरवली. तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. विशेष म्हणजे तिला मोदींचा पत्ताही माहीत नव्हता. तिनं फक्त नरेंद्र मोदी दिल्ली एवढ्याच पत्त्यावर पत्र पाठवलं. ते पत्र मोदींपर्यंत बरोबर पोहोचलं. 


पत्र वाचताच मोदींनी तात्काळ या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश पंतप्रधान कार्यालयाला दिले. पंतप्रधान कार्यालयांनी या प्रकरणाचा तातडीनं तपास केला... हश्मितानं केलेल्या तक्रारीत तथ्य आढळलं. ताबडोतोब राजघाटावरचा सगळा कर्मचारी वर्ग बदण्यात आला.. एवढंच नाही,तर आता हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी तातडीनं सीसीटीव्हीही बसवण्यात आलेत. Rajghat Samadhi Samitiनंही हश्मिताच्या या कामगिरीची दखल घेत तिला आभार मानणारं पत्र लिहिलंय. अशा प्रकारे नेहमी सत्यासाठी लढणा-या बापूंच्या समाधीशेजारचा भ्रष्टाचार संपला..