अहमदाबाद : आपल्या आजूबाजूला चोरी आणि दरोडा पडल्याच्या बातम्या नेहमीच आपल्या कानावर पडत असतात. पाहिल्या काळात चोरांच्या चोरी करण्याच्या पद्धती वेगळ्या असायच्या. परंतु काळाप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बदलू लागल्या तसतसे चोरांच्या चोरी करण्याच्या पद्धत देखील बदलू लागल्या. आताचे चोर हे इतके हूशार झाले आहेत की, ते टेक्नोलॉजीप्रमाणे आपली चोरी करण्याची पद्धत बदलतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु अहमदाबादमधील चोरीचे एक प्रकरण समोर आले आहे, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण येथे चोरांनी चक्कं खेळण्यातील बंदूक आणि हातोड्याच्या मदतीने दागिन्यांचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.


दुकान लुटण्यासाठी हे चोर पती-पत्नी खेळण्यातील बंदूक आणि हातोडा घेऊन आले. सर्व काही त्यांच्या प्लॅनींगनुसार घडत होते. परंतु जेव्हा हे दोघे ही दरोडा टाकत होते तेव्हा असे काही झाले की, त्यांचे रहस्य उघड झाले आणि ते त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत.


ही घटना अहमदाबादच्या कृष्णानगर भागातील आहे. यामध्ये पती-पत्नीने दागिन्यांचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु पकडल्यानंतर त्यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत त्यांच्याकडे काम नसल्यामुळे आणि त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले. दरम्यान, त्यांनी साऊथमधील चित्रपट  पाहिला आणि त्याप्रमाणे दागिन्यांचे दुकान लुटण्याची योजना त्यांनी आखली.


दिवसा धवळ्या दागिन्यांची दुकान लुटण्यासाठी आलेल्या या दोन चोरांपैकी, पत्नीच्या हातात हातोडा होता, तर पतीकडे टॉय गन घेतली होती. ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश करताच त्या दोघांनी कर्मचार्‍यांना बाजूला होण्यास आणि धमकावण्यास सुरवात केली.


परंतु या कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याने थोडा धिर करत आणि आपली हूशारी दाखवत या चोरांना विरोध करायला सुरवात केली, तेव्हा या जोडप्याचे रहस्य उघड झाले आणि लोकांना कळले की, त्यांनी यासाठी खोटया गन वापरल्या होत्या.


त्या पती-पत्नीचं पितळ उघड पडल्यानंतर दोघांनीही माफी मागितली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले त्यानंतर त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या चोरांचं नाव भरत गोयल आणि योगिता गोयल असे आहे.


भरत हा शिवणकाम करत होता. पकडल्यानंतर या जोडप्याने सांगितले की, कोरोना साथीच्या आजारामुळे त्यांचे काम थांबले आहे आणि यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, ज्यामुळे या दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार केला. आता पकडल्या गेल्यानंतर दांपत्य पोलिसांना त्यांना सोडून देण्याची विनंती करत आहेत.