Covid 19: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संपूर्ण देशभरात....
Covid 19: देशात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Covid 19: देशात कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत करोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नियमावली जाहीर करत असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली," अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली होती.
"जागतिक स्तरावर दररोज 88 हजार रुग्ण असून भारतात 4 हजार रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रोज 550 रुग्ण आढळत आहेत. लसीकरणदेखील सुरू आहे. कमी मागणी असली तरी लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ व्यक्ती, इतर आजार आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे," अशी माहिती भारती पवार यांनी दिली आहे. राज्यातील मंत्र्यांना बैठक घेण्याची सूचना देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. फार घाबरून जाण्याची गरज नाही, पण सतर्क राहा. असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
बैठकीत सहभागी झालेल्या झारखंडच्या आरोग्यमंत्र्यांनी नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की "केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. कोरोना काही राज्यांमध्ये वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना सर्व राज्यांसाठी समान नियमावली जाहीर करण्याची विनंती केली आहे. जेणकरुन वेळेत कोरोनाला रोखता येईल. त्यांनी मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला असून 10 आणि 11 तारखेला करणार आहोत".
पुढे त्यांनी सांगितलं की, आम्हीदेखील आमच्या स्तरावर सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. आम्हीदेखील नियमावली जाहीर करणार आहोत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशभरात एका दिवसात तब्बल 6050 रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 13 टक्के इतकी आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 30 हजार 943 वर पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 4 कोटी 47 लाख 85 हजार 858 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, डिस्चार्च देण्यात आला आहे.