बूस्टर डोसबाबत सरकारची मोठी घोषणा, `18 वर्षांवरील व्यक्तींना...`
18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Booster Dose: जगभरातील कोरोनाचं संकट कमी झालं असलं तरी धोका मात्र कायम आहे. त्यामुळे सरकार वेळोवेळी उपाययोजना करत आहे. कोरोनाचं संकट पूर्णपणे संपावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देशात 18 वर्षांवरील नागरिकांचे दोन डोस झाले आहे. तर 60 वर्षांवरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात आला आहे. आता 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांसाठी कोविड-19 बुस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. बुस्टर डोससाठीचं अंतर 3 महिन्यांनी कमी केलं आहे. याआधी कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर बुस्टर डोस घेण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने या शिफारशीला मान्यता दिली आहे. 18-59 वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना सावधगिरीचा डोस दुसऱ्या डोसच्या तारखेपासून सहा महिने किंवा 26 आठवड्यांनंतर खासगी लसीकरण केंद्रात दिला जाऊ शकतो.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांसाठी कोविड-19 खबरदारीच्या डोसचे अंतर सध्याच्या 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे.
वृद्धांना मोफत लस दिली जाईल
केंद्रीय आरोग्य सचिवांनी जारी केलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, 60 वर्षांवरील वृद्ध तसेच आरोग्य कर्मचारी (एचसीडब्ल्यू) आणि फ्रंटलाइन वर्कर्स (एफएलडब्ल्यू) यांना सहा महिने पूर्ण झाल्यानंतर कोविड बूस्टर डोस मोफत दिला जाईल. यापूर्वी मे महिन्यात, सरकारने परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार नऊ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीपूर्वी लसीचा बूस्टर डोस घेण्याची परवानगी दिली होती.