डबल मास्क घालून कोरोनाचा प्रसार रोखणं शक्य ? तज्ञांनी दिलंय उत्तर
ट्रान्समिशन थांबविण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची आकडेवारी वेगनाने वाढतेय. सोमवारी 24 तासांत 1.68 लाख नव्या केसेस नोंदवल्या गेल्या. कोविड १९ टाळण्यासाठी तोंडावर मास्क लावणे फार महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहितेय. पण तज्ञांनी डबल मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञ म्हणतात की, ट्रान्समिशन थांबविण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय आहे.
दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध विभागाचे संचालक डॉ. रोमेल टिकू यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्जिकल मास्क आणि कपड्याचा मास्क किंवा दोन कपड्यांचा मास्क घालू शकता. तथापि, N95 मास्क घातल्यास दोन मास्कची गरज लागणार नाही.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. रोमेल टिकू यांनी म्हटलंय की, जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी जात असते, जेथे सोशल डिस्टन्सिंग शक्य नसते. त्यावेळी त्यांना डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डबल मास्क घालून संक्रमित व्यक्तीच्या जवळून गेलात तरी ड्रॉपलेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते.