मोदींचे `मिशन शक्ती` भाषण अडचणीत, निवडणूक आयोगाचे तपासण्याचे आदेश
नरेंद्र मोदी यांनी `मिशन शक्ती`वर भाषण केले. हे भाषण आता मोदींना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या 'मिशन शक्ती' या भारताच्या यशस्वी मोहीमेचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी 'मिशन शक्ती'वर भाषण केले. हे भाषण आता मोदींना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. मोदी निवडणुकीला उभे राहिले आहेत. त्यांनी निवडणूक आचारसंहिता भंग केली असा विरोधकांनी आरोप केला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मोदी यांच्या भाषणाची तपासणी करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही मोदींच्या भाषणावर आक्षेप नोंदवला आहे. त्याचेवळी त्यांनी मोदी काय अंतराळात गेले होते?, अशी खरमरीत टीका केली.
नरेंद्र मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. माकपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या 'मिशन शक्ती' या भारताच्या यशस्वी मोहीमेची माहिती मोदी यांनी आज दुपारी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे देशाला दिली. निवडणूक आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भाषणाची प्रत आयोगाने मागितली आहे.
मोदींनी भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपने केला आहे. या प्रकरणी माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून लेखी तक्रार केली आहे. मोदी हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. तसेच निवडणुकीच्या काळात त्यांनी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे येच्युरी यांनी पत्रात नमुद केले आहे.