Crime news : पालकांना खोटं सांगुन 10 वर्षांच्या मुलीला सुट्टीत घरी घेऊन जाणाऱ्या चुलत भावाने त्या मुलीची परराज्यात विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नराधम चुलत भावाने लग्नाच्या नावाखाली या मुलीची 1 लाख 60 हजार रुपयात विक्री केली. मुलीने वडिलांना लिहिलेल्या पत्रामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.


बिहारमधल्या बख्तियारपूरमध्ये ही घटना घडली. काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी मुलीच्या घरी आले आणि मुलीला काही दिवसांसाठी त्यांच्यासोबत जाऊ द्या, असं सांगितलं.


नातेवाईक असल्याने वडिलांनी मुलीला त्या  दोघांसोबत जाण्यास परवानगी दिली. आठ दिवसांनी मुलीला आणण्यासाठी मुलीचे वडिल बख्तियापूरला पोहोचले.  तेव्हा चुलत भाऊ आणि त्याच्या पत्नीने मुलगी एक नातेवाईकाच्या घरी गेली असून काही दिवसांनी येईल असं सांगतिलं.


काही दिवसांनी ते पुन्हा मुलीला आणण्यासाठी गेले असता चुलत भाऊ आणि त्याची पत्नी बेपत्ता होते. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांच्या मुलीला राजस्थानच्या बांदी जिल्ह्यातील हथनापूर इथल्या देवीलाल बोका यांचा मुलगा मुकेश बोका याच्याबरोबर खोट्या लग्नाच्या नावाखाली 1 लाख 60 हजार रुपयांना विकल्याचं समोर आलं. 


हा प्रकार ऐकून मुलीच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलीला आणण्यासाठी तात्काळ राजस्थान गाठलं. राजस्थानमध्ये ज्या ठिकाणी मुलीला विकण्यात आलं होतं, ते घर त्यांनी गाठलं. पण तिथे त्यांना मुलीला भेटू दिलं नाही. आधी 1 लाख 60 हजार रुपये घेऊन या आणि मगच मुलीला घेऊन जा असं त्यांना सांगण्यात आलं. 


अखेर मुलीच्या वडिलांनी पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत त्या मुलीची सुटका केली असून मुलीला वडिलांच्या स्वाधिन करण्यात आलं. तर फरार असलेल्या चुलत भाऊ आणि त्याच्या पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत.