Police Constable Misbehave With Muslim Women: वाहनचोरीची तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनला गेलेल्या मुस्लीम महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. पोलीस स्टेशनमधील मुख्य हवालदारावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या बुरख्यातील तक्रादार महिलेला, 'तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर चेहरा दिसत नाहीये,' असं म्हणाला. 


पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहन चोरीला गेल्याने त्यासंदर्भातील तक्रार केल्यानंतर त्यासंदर्भातील तपासाची चौकशी करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना पोलीस हवालदाराने एक वाग्रस्त विधान केलं. या प्रकरणाची चांगलीच चर्चा चेन्नई शहरात झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. समोर आलेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांच्या दलातील सदर पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे.


ती महिला पोलीस स्टेशनमध्ये रडू लागली


14 फेब्रवारी रोजी या महिलेची गाडी चोरीला गेली होती. याचसंदर्भात तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. पोलिसांना महिलेची हरवलेली ही दुचाकी सापडली. मात्र प्रमुख हवालदाराने या महिलेला, 'तुला तुझी स्कुटी परत हवी असेल तर कोर्टात जावं लागेल,' असं सांगितलं.  मात्र कोर्टाच्या फेऱ्या आणि कायदेशीर गोष्टींचा विचार करुन ही महिला रडू लागली. तिने या हवालदाराकडे कृपा करुन माझी दुचाकी मला नेऊ द्या असं म्हणत विनंती केली.


तो पोलीस हवालदार नेमकं काय म्हणाला?


यावर त्या पोलीस हवालदाराने महिलेला समजावण्याऐवजी किंवा कायदेशी बाजू समजावून सांगण्याऐवजी तिच्या दिसण्यासंदर्भात टीप्पणी केली. सदर महिला स्कूटी थेट मिळावी अशी मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये रडत उभी असताना अचानक या हवालदाराने, 'तू रडताना फार सुंदर दिसतेस. एक काम कर तू तुझा बुरखा बाजूला कर. तो तुझा सुंदर चेहरा झाकतोय,' असं म्हटलं. हवालदाराचं हे विधान ऐकून या महिलेला धक्काच बसला.


तिने हवालदाराविरुद्ध केली तक्रार


पीडितेने या हवालदाराविरुद्धच तक्रार दाखल केली. सदर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली. आरोपी हवालदाराला तातडीने निलंबित करण्यात आलं.


पोलिसांवर टीकेची झोड


पोलिसांकडूनच तक्रारदार महिलेची छेड काढण्यात आल्याने अनेकांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला. पोलिसच असं वागणार असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय होणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. या प्रकरणामध्ये हवालदाराला केवळ निलंबित करुन चालणार नाही तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे असं मतही अनेकांनी नोंदवलं.