Man Murdered Girl: झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील चैनपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हरभोंगा गावामध्ये एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. कौटुंबिक वादामधून एका व्यक्तीने आपल्याच भाचीची गळा आवळून हत्या केली. होळीच्या दिवशीच या व्यक्तीने आपल्या भाचीची हत्या केली. हत्या केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार आत्महत्येचा असल्याचं दाखवण्यासाठी मामानेच आपल्या भाचीचा मृतदेह छताला लटकवल्याचंही समोर आलं आहे.


पोलिसांनी काय माहिती दिली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नावं छोटन पांड्ये असं आहे. पांड्येने आपल्या 14 वर्षीय भाचीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर या मुलीने आत्महत्या केल्याचं दाखवण्यासाठी त्याने तिचा मृतदेह एका दोरीला बांधून छताला टांगला. पोलिसांना या मुलीचा मृतदेह तिच्या आजोबांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोशाळेमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेनंतर आरोपी मामा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील देवकुमार पांड्ये आणि छोटन पांड्ये यांच्यामध्ये मागील बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. संपत्तीच्या विषयावरुन हा वाद सुरु होता. याच वादामधून छोटन पांड्येनं देवकुमार पांड्येच्या मुलीची हत्या केली. 


नेमकं घडलं काय?


होळीच्या दिवशी पूजेसाठी देवकुमार पांड्ये आपल्या पत्नीबरोबर मूळ गावी विशुनपुरा गढवा येथे गेला होता. त्यावेळी छोटन पांड्ये घरी आला. त्याने गप्पा मारत मारत या मुलीला तिच्याच आजोबांच्या मालकीच्या गोशाळेमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. नंतर ही आत्महत्या असल्याचं दाखवण्यासाठी तिचा मृतदेह छप्पराला लटकवला.


या घटनेबद्दल घरातील लोकांना समजलं तेव्हा त्यांनी गोशाळेत धाव घेत या मुलीचा देह खाली उतरवला आणि तिला घरात नेलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारुन आणि इतर मार्गांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. चैनपूर पोलीस स्थानकाचे प्रमुख उदय कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेदिनीराय चिकित्सा महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आला आहे.