Crime News : 11 वर्षांच्या मुलाची त्याच्या 14 वर्षांच्या बहिणीनेच (Sister) हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. 11 वर्षांच्या मुलाने कोणाचं काय बिघडवलं होतं, असा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता. पोलिसांनी (Police) तपास सुरु केला, पण त्यांना यश येत नव्हतं. अखेर पोलीस श्वानाची मदत घेण्यात आली. स्निफर डॉग (Sniffer Dog) रुबीला तपासासाठी आणण्यात आला. पोलिसांना घरातल्याच काही लोकांवर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी सर्वांना एकत्र स्निफर डॉग रुबीसमोर उभं केलं. पोलिसांचा हा डाव यशस्वी ठरला. रुबीने एकाच झटक्यात आरोपीला पकडून दिलं. धक्कादायक म्हणजे खूनी त्या मुलाची चौदा वर्षांची बहिणच होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'म्हणून भावाची हत्या केली'
छत्तीसगडमधल्या (Chhattisgarh) रायगड जिल्ह्यातली ही घटना आहे. मृत मुलाचं नाव प्रीतम असं होतं. तर उषा असं 14 वर्षांच्या आरोपी मुलीचं नाव आहे. उषा ही प्रीतमची मावस बहिण आहे. प्रीतम आणि त्यांच कुटुंब उषाला चोर म्हणून चिडवत असतं. याचा राग तिच्या मनात होता. घटनेच्या दिवशी प्रीतमने उषाला पुन्हा चोर-चोर म्हणून चिडवलं. यावर संतापलेल्या उषाने संधी मिळताच लोखंडाच्या रॉडने प्रीतमच्या डोक्यावर वार केले. यात प्रीतमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर उषाने प्रीतमचा मृतदेह बंद असलेल्या शाळेत फेकून दिला आणि तिथून पळ काढला.


खेळता खेळता गायब झाला प्रीतम
चिरईपानी गावात आपल्या कुटुंबासह राहणारा प्रीतम बुधवारी दुपारी चार वाजता आपल्या मित्रांबरोबर खेळत होता. पण काही वेळाने तो अचानक गायब झाला. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरु केली. पण बराच शोध घेतल्यानंतरही प्रीतम सापडत नव्हता. त्यावेळी गावातील काही जणांनी जवळच असलेल्या शाळेत शोध घेतला असता शाळेतल्या एका वर्गात प्रीतमचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. याबाबत तात्काळ पोलिसांनी माहिती देण्यात आली. 


पोलिसांनी सुरु केला तपास
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरु केला. फॉरेन्सिंग टीमने घटनास्थळावरुन काही पुरावे जमा केले. पण यानंतरही हत्या नेमकी कोणी आणि का केली याचा तपास लागत नव्हता. अखेर पोलिसांनी स्निफर डॉग रुबीला पाचारण केलं. रुबीने घटनास्थळाचा वास घेत आरोपीचा माग काढायला सुरुवात केली. काही वेळाने रुबीने उषावर झडप मारली. पोलिसांनी तात्काळ उषाला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. चौकशीत उषाने आपला गुन्हा कबूल केला. 


चोर म्हणून चिडवल्याने संताप
प्रीतम, त्याची आई आणि प्रीतमच्या दोन बहिणी उषाला वारंवार चोर म्हणून चिडवत असत. यावरुन तीचं त्यांच्याबरोबर अनेकवेळा भांडणही होत होतं. 24 मे रोजी प्रीतम घराकडे खेळत असताना उषाने संधी साधत त्याला शाळेजवळ नेलं. तिथे त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करत त्याची हत्या केली आणि मृतदेह शाळेतल्या एका वर्गात फेकला. त्यानंतर ती घरी परतली.