Viral Video: सोसायटीतल्या चिमुकल्यांवर सोडला कुत्रा, विचारायला गेलेल्या वृद्ध दांपत्यालाच बहिणींची मारहाण!
नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, यात दोन बहिणींनी पाळीव कुत्र्याच्या वादावरून एका वृद्ध दांपत्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर सेक्टर 113 पोलिस ठाण्यात या बहिणींवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Noida Viral Video : सध्या अनेक घरांमध्ये कुत्रा, मांजर या सारखे प्राणी पाळले जातात. या पाळीव प्राण्यांवरून शहरातील सोसायट्यांमध्ये अनेकदा भांडणही होत असतात. मात्र नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, यात दोन बहिणींनी पाळीव कुत्र्याच्या वादावरून एका वृद्ध दांपत्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर सेक्टर 113 पोलिस ठाण्यात या बहिणींवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
नोएडाच्या सेक्टर 78 हाय-राईज सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री 9: 30 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी एक्स टॉवरमध्ये भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोन बहिणी रात्री त्यांचा पाळीव कुत्रा सोसायटीच्या आवारात फिरवत होत्या. थोड्यावेळाने दोघी मुलांच्या खेळण्याच्या मैदानाजवळ आल्या आणि त्यातील एका बहिणीने त्यांचा पाळीव कुत्रा तेथे सोडून दिला. तेथील रहिवाशांनी कुत्रा मुलांच्या खेळाच्या मैदानात मोकळेपणाने फिरत असल्याचे पाहिल्यावर त्यावर आक्षेप घेतला. पाळीव कुत्रा जेव्हा एका तीन वर्षांच्या लहान मुलीच्या जवळ गेला तेव्हा मुलीची आई पाळीव कुत्रा घेऊन फिरणाऱ्या दोन बहिणींवर जोरात ओरडली. यावर त्यातील एका बहिणीने महिलेशी वाद घालून तिच्या कानाखाली मारली.
मोठा आवाज झाल्याचे ऐकून महिलेचे वृद्ध सासरे तिथे आले आणि त्यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. वृद्ध व्यक्ती भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असताना बहिणींनी वृद्ध व्यक्तीलाच मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पीडित कुटुंबाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले. संबंधित घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सोसायटीतील लोकांनी केलं असून घटनेचे पुरावे पोलिसांना दिले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होतं आहे.
हेही वाचा : Gold Price : धनत्रयोदशीपूर्वी सोनं झालं महाग; दिवाळीपूर्वीच सोन्याचा भाव वधारला
व्हिडीओ व्हायरल :
सोसायटीतील रहिवासी आणि पोलीस काय म्हणाले?
सदर प्रकरण झालं तेव्हा उपस्थित असलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले की भांडणानंतर, एका बहिणीने संबंधित वृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला याचे भयंकर परिणाम होतील अशी धमकी दिली. वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीवरून, शुक्रवारी सकाळी दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु दोन बहिणींनी लेखी माफीनामा सादर केल्यानंतर प्रकरणात तडजोड करण्यात आली अशी माहिती सेक्टर 113 चे स्टेशन हाउस ऑफिसर कृष्ण गोपाल शर्मा, यांनी दिली आहे.