बगहा : बिहारमध्ये पुन्हा एकदा खाप पंचायतीनं कायदेव्यवस्था आपल्या हाती घेतल्याची घटना समोर आलीय. एका प्रेमी जोडप्याला खाप पंचायतीच्या हुकुमावरून हात बांधून संपूर्ण गावात फिरवण्यात आलं... त्यानंतर त्यांना दोरीनं बांधून सामूहिक मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आलीय. बगहामधल्या वाल्मीकिनगर स्टेशन परिसरातील संतपूर सोहरियामध्ये ही घटना घडलीय. या परिसरात थारू आदिवासी मोठ्या संख्येनं राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, नौरंगिया परिसरातील एका तरुणाचं एका तरुणीवर प्रेम होतं. एकमेकांसोबत विवाह करण्याची इच्छा दोघांनीही आपल्या कुटुंबीयांसमोर व्यक्तही केली. परंतु, मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र तिची इच्छा धुडकावून लावत तिचं दुसऱ्याच एका तरुणाशी जबरदस्तीनं विवाह लावून दिला. 


ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री प्रियकर तरुण तरुणीच्या घरी तिला भेटण्यासाठी दाखल झाला होता. दोघांनाही सोबत पाहून कुटुंबीयांचा पारा चढला... आणि त्यांनी गाव गोळा केलं. पंचायतीनं या दोघांच्या प्रेमाचा विरोध करत त्यांना शिक्षा फर्मावली. 


घोळक्यानं कायदेव्यवस्था आपल्या हाती घेत या प्रेमी जोडप्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना एका दोरीनं बांधून परिसरात फिरवण्यात आलं. यामुळे, या परिसरातील इतर नागरिकही धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.


या मारहाणीचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्यात आला. वाल्मिकीनगर पोलिसांनी मात्र अशी कोणत्याही घटनेची सूचना मिळाल्याच्या वृत्ताला नकार दिलाय. 


खाप पंचायतीनं आणि घोळक्यानं कायदेव्यवस्था आपल्या हाती घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आरोपींवर कारवाईही झाली. परंतु, खाप पंचायतीची धास्ती काही कमी होताना दिसत नाही.