Cyber Crime : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. पण त्याचबरोबर याचा दुरुपयोगही होऊ लागला आहे. गेल्या काही काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) गुन्ह्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धत शोधत सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. आता असाच फसवणूकीचा असाच एक नवा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल चार कोटी 67 लाख रुपयांचा चूना लावला. पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करत सायबर गँगचा (Cyber Gang) पदार्फाश केला. पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमका प्रकार?


तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधला हा धक्कादायक प्रकार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नईतल्या अभिरामपुरममध्ये राहाणारे 72 वर्षांचे निवृत्त इंजिनिअरना एक कॉल केला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तुमचं सिम कार्ड दोन तासात बंद होणार असून अधिक माहितीसाठी 9 बटन दाबा असं सांगितलं.


तो मोबाईल नंबर आधार कार्ड, बँक पासबूक, विमान आणि एलपीजी कनेक्शनशी जोडण्यात आला होता. समोरच्या व्यक्तीने तुमच्या मोबाईलनंबरवरुन हवालाच्या पैशांच्या व्यवहार झाल्याचा सांगितलं. त्यामुळे तुमच्या नावावर मुंबई आणि दिल्ली सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यानंतर त्यांना मोबाईलवर नऊ बटन दाबण्यास सांगण्यात आलं.


सिम कार्ड बंद होण्याच्या भीतीने निवृत्त इजिनिअरने 9 बटन दाबलं. नऊ बटन दाबताच कॉल ट्रान्सफर झाला आणि दुसऱ्या एका व्यक्तीने मुंबई पोलीस बोलत असल्याचं सांगितलं. मुंबई पोलिसांच्या नावावर बोलणाऱ्या त्या ठगाने तुमच्या नावाचं पार्सल जप्त करण्यात आलं असून यात अंमलीपदार्थ, बोगस पासपोर्ट, 257 एटीएम कार्ड आणि वाघाची चामडी असल्याचं सांगितलं. दोन तासात तुम्ही मुंबईच्या सायबर क्राईम ठाण्यात पोहोचला नाहीत तर तुम्हाला अटक केली जाईल असं त्यांना सांगण्यात आलं.


इंजिनिअरने केली चूक


थेट मुंबई पोलिसांतून फोन आल्याने घाबरलेल्या निवृत्त इंजिनिअरने प्रकरण मिटवण्यासाठी काय करावं लागेल, असा प्रश्न विचारला. यावर तुम्हााल डिजिटल अरेस्ट करण्यात आलं असून प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांच्याकडे बँकेची सर्व माहिती मागवण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातले सर्व पैसे आपल्या खात्यात वळते केले. खात्यातून पैसे जाताच आपली फसवणूक झाल्याचं त्यांना कळलं आणि त्यांनी पोलिस ठाणं गाठलं.


13 आरोपी अटक


निवृत्त इंजिनिअरने सायबर पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखत चेन्नई सायबर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करत तपास सुरु केला. ठगांनी सर्वा पैसे हवालामार्फत परदेशात पाठवले होते. त्यानंतर तेच पैसे क्रिप्टो करन्सीच्या रुपात भारतात आणण्यात आले. सायबर पोलिसांनी कारवाई करत सायबर गँगचा पर्दाफाश केला. याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 53 लाख रुपये, मोबाईल फोन, चेक बूक, एटीएम कार्ड, पासबूक आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.