मुंबई: आयएमडीने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या वादळाला 'तितली' असं नाव देण्यात आलं आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे जाणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागांमध्ये या वादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्याच आला आहे. 


हवामान खात्याच्या निरिक्षणानुसार हे चक्रीवादळ मागील काही तासांपासून ताशी आठ किलोमीटर इतक्या वेगाने पश्चिमेकडून उत्तर- पश्चिम दिशेला जात आहे. 


आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळाचा केंद्रबिंदू ओडिशातील गोपालपूर येथून जवळपास ५३० किमी. दक्षिण पूर्व आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपट्टनमपासून जवळपास ४८० किमी. पूर्व दक्षिण या भागात आहे. 



'तितली' या वादळामुळे ओडिशाच्या किनारी  भागात येणाऱ्या गजपती, गंजाम, पुरी, जगतसिंहपूर या परिसरांमध्ये वादळाचा तडाखा बसू शकतो. त्याशिवाय या भागात बुधवार आणि गुरुवारी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. 


दरम्यान, हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्यानंतर संबंधित राज्यशासनांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.