मुंबई : आपल्या गरजेची वस्तू आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार एकरकमी किंवा हफ्त्यांद्वारे खरेदी करतो. हफ्त्यांद्वारे खरेदी करण्याच्या पर्यायामुळे अनेकांना आपल्याला हवी असलेली वस्तू घेणे सोयीचे ठरते. त्यातच आता घरगुती वापराचा सिलिंडर गरिबांसाठी हफ्त्यांवर देण्याचा नवा निर्णय घेण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या महागाईमुळे सामन्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू एकरकमी खरेदी करता येत नाहीत. त्यासाठी उसने पैसै घेऊन त्या खरेदी कराव्या लागतात.  अशी परिस्थिती कोणावर येऊ नये यासाठी 'सिलिंडर हफ्त्यांवर' हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. या पर्यायाद्वारे सामन्यांना सिलिंडर सुलभ हफ्त्यांमध्ये घेता येणार आहे. तसेच या सिलिंडरची रक्कम चार हफ्त्यांमध्ये परत करण्याची मुभा देण्यात येणार आहे. काही दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर या निर्णयाचा फायदा घेता येईल.


काही भागांमध्ये सिलिंडर घरपोच केला जातो. अशावेळा आपल्या जवळ पैसे उपलब्ध नसल्याने अनेकदा अडचण निर्माण होते. अशावेळेस पैशांअभावी सिलिंडर आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यानंतर याचा अनेकांना लाभ होणार आहे.   


देशभरात उज्ज्वला योजनेचा अनेक गरजूंना लाभ झाला. या योजनेचा एकट्या उत्तर प्रदेशमधील १. ६ कोटी लोकांना लाभ झाला. पण यातून एक गोष्ट निदर्शनास आली. या योजनेचा लाभ घेतलेल्या १.६ कोटी लोकांमधून २० टक्के लोकांना या योजनेअंतर्गत दिलेल्या सिलेंडरची रक्कम एकरकमी देता आली नाही.


त्यामुळे देशातील सामन्य जनतेला आर्थिक अडचणींमुळे या अशा योजनेला मुकावे लागू नये यासाठी केंद्र सरकारने हा सुलभ हफ्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ही योजना आधी उत्तर प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणार आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पुढे देशभरात ही सुविधा सुरु केली जाणार आहे.