दलित खासदार सावित्रीबाई फुलेंचे भाजपवर गंभीर आरोप; पक्षालाही सोडचिठ्ठी
हनुमान हा दलित होता व मनुवाद्यांचा गुलाम होता.
बहराइच: उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजप समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू देवता दलित असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांनी हनुमानाचा संदर्भ देत एक वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, हनुमान हा दलित होता व मनुवाद्यांचा गुलाम होता. दलित आणि मागास जातींना त्या काळात वानर व राक्षस संबोधले जायचे. रावणाविरुद्धच्या लढाईत रामला हनुमानाची खूप मदत झाली होती. मात्र, दलित असल्यामुळे रामाने हनुमानाला मानव करण्याऐवजी वानर केले. मी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, दलित असल्यामुळे कोणीही माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सावित्रीबाई यांनी म्हटले.
याशिवाय, सावित्रीबाई फुले यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केले. दलितांना राम मंदिर नको तर संविधान हवे, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून संविधान संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच दलित आणि मागासवर्गीय जातींचे आरक्षण रद्द करण्याचे प्रयत्नही पद्धतशीरपणे सुरु आहेत. मात्र, मी जिवंत असेपर्यंत तसे होऊ देणार नाही. येत्या २३ तारखेला लखनऊ येथे होणाऱ्या सभेत मी काहीतरी मोठे करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
काही महिन्यांपूर्वी भाजप नेतृत्वाकडून पक्षाच्या नेत्यांना दलित समाजातील लोकांच्या घरी जाऊन राहण्याचे आदेश देण्यात आले होते. जेणेकरून दलित मतदारांमधील भाजपविषयीचे गैरसमज दूर होतील. मात्र, या उपक्रमावरही सावित्रीबाई फुले यांनी ताशेरे ओढले होते. तसेच मध्यंतरी त्यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांना 'महापुरुष' म्हणून संबोधले होते. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली होती.