अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका दलिताची निर्घृण हत्या करण्यात आलीय. दलित तरुणानं उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील एका तरुणीसोबत विवाह केला होता. या विवाहामुळे नाराज असलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी 'महिला हेल्पलाईन' सदस्यांसमोरच या तरुणावर धारदार शस्त्रानं वार केले आणि त्याची हत्या केली. या दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी महिला हेल्पलाईन असलेल्या 'अभयम'च्या सदस्यांवरही हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव हरेश सोलंकी आहे. २५ वर्षीय हरेश आणि उर्मिला झाला यांची भेट महाविद्यालयात झाली. दोघांनीही विवाहाचा निर्णय घेतला. परंतु, हरेश दलित वर्गातून असल्यानं तरुणीच्या कुटुंबाचा मात्र या विवाहाला नकार होता. परंतु, त्यांच्या नकाराला झुडकारून हरेश आणि उर्मिलानं विवाह केला. 


लग्नानंतर उर्मिलाच्या कुटुंबीयांनी आपली या लग्नाला मान्यता असल्याचं भासवत उर्मिलाला आपल्या घरी नेलं... परंतु, नंतर मात्र त्यांनी उर्मिलाला हरेशसोबत पाठवण्यास नकार दिला. हरेशनं सरकारी १८१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करत 'अभयम'ची मदत घेतली. सोमवारी सायंकाळी, उर्मिलाच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या अभयमच्या टीमवर आणि हरेशवर जमावानं जीवघेणा हल्ला केला. 'अभयम'ची गाडीही फोडण्यात आली. 



'अभयम'च्या सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केलीय. पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तील अटक केलीय. परंतु, इतर आरोपी मात्र फरार आहेत.