Followers वाढवण्यासाठी कायपण... Bike स्टंटबाजी करणाऱ्याला पोलिसांनी अशी अद्दल घडवली की...
Bike Stunt Viral Video: वाहतूक सुरु असतानाही हा तरुण रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्याचं पाहून अनेक येणाऱ्या जाणाऱ्यांना धक्का बसला. त्यापैकीच काही जणांनी या स्टंटबाजीचा घटनाक्रम कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली.
Jaipur Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोक हल्ली काहीही करतात. आपला व्हिडीओ आणि कंटेट व्हायरल व्हावा या हेतूने लोक अगदी स्वत:चा जीव धोक्यात टाकण्यासाठीही तयार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या राजस्थानमधील जयपूरमधून समोर आला आहे. येथील एक तरुण वर्दळीच्या रस्त्यावर धावत्या बाईकवर स्टंटबाजी करत असल्याचं दिसत आहे. या तरुणाने केलेली हिंमत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीविरोधात पोलिसांनी कठोर करवाई केली आहे.
वाहतूक सुरु असतानाही स्टंटबाजी
रस्त्यावर वाहतूक सुरु असतानाही हा तरुण स्टंटबाजी करत असल्याने अनेकांना धक्का बसला. काहीतरी विपरीत घडणार असल्याचा अंदाज अनेकांना आला. त्यामुळेच अनेकांनी ही स्टंटबाजी कॅमेरामध्ये कैद केली. हा व्हिडीओ काही जणांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओची दखल पोलिसांनी घेतली.
तरुणाची ओळख पटली
व्हिडीओमधील तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला. जवाहर सर्कल पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल शांतिलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाचं नाव हेमंत मीणा असून तो 25 वर्षांचा आहे. तो जयपूरमधील एका कॉलेजचा विद्यार्थी आहे. मात्र सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तो जीव धोक्यात टाकून स्टंटबाजी करत व्हिडीओ तयार करतो.
पोलिसांनी दिली ही शिक्षा
हेमंत हे व्हिडीओ त्याचे मित्रच शूट करतात असं पोलिसांनी सांगितली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हेमंत आणि त्याच्या मित्रांची चौकशी केली. त्यांना इशारा देऊन सोडून देण्यात आलं आहे. मात्र या स्टंटबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी अनोख्या पद्धतीने पोलिसांनी अद्दल घडवली आहे. या सर्वांना सोडलं असलं तरी वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंड आकारुन हेमंतची बाईक मात्र पोलिसांनी जप्त केली आहे. आता ही बाईक पोलिसांच्याच ताब्यात आहे.
स्टंटबाजीचं प्रमाण वाढलं
मागील काही काळामध्ये अशाप्रकारे जीव धोक्यात घालून बाईकवर रोमान्स करण्याचे प्रकारही वाढले आहेत. अनेकदा तरुण तरुणी बाईकवर नको त्या अवस्थेत बसून थ्रील अनुभवण्याच्या नावाखाली स्वत:बरोबरच इतरांचा जीवही धोक्यात घालत असल्याचं चित्र पहायला मिळतं. मागील काही महिन्यांमध्ये देशातील अनेक शहरांमधून असे व्हायरल व्हिडीओ समोर आले आहेत. काही व्हिडीओमध्ये तरुणी बाईक चालवणाऱ्याच्या समोर म्हणजेच फ्युएल टँकवर बाईक चालवणाऱ्याच्या दिशेने तोंड करुन बसल्याचं दिसून आलं. वेगाने रस्त्यावरुन वाहनं जात असताना ही अशी स्टंटबाजी करुन इतरांचा जीवही हे तरुण धोक्यात घालतात. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असली तरी हे असले प्रकार थांबण्यास तयार नाहीत. यासंदर्भात पोलिसांकडून जनजगृतीचाही प्रयत्न सुरु असले तरी या प्रकरणांवर चाप लावण्यास त्यांना अपयश येत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.