दाऊद इब्राहिम कराचीतच, सबळ पुराव्यामुळे पाकिस्तानची पोलखोल
पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
नवी दिल्ली : भारताचा कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपला आहे. भारत जेव्हा पाकिस्तानात असलेल्या दाऊदच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उचलतो तेव्हा तो फेटाळला जातो. मुंबईत 1993 झालेल्या सिरियल ब्लास्टचा मास्टर माइंड दाऊद गेल्या 25 वर्षांपासून फरार असून पाकिस्तानात राहून तो भारताविरुद्ध कारवाया करत असतो. पण यानिमित्ताने पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
गुप्तचर यंत्रणांकडुन असा एक फोटो मिळाला आहे जो दाऊदचे आंतरराष्ट्रीय व्यवहार पाहणाऱ्या जाबिर मोतीवालशी मिळता जुळता आहे. या फोटोत दाऊदही दिसत आहे. दाऊदला गुडघ्यांचा आजार झालाय असे वृत्त माध्यमांतून यापुर्वी आले होते. पण या फोटोत तो तंदुरुस्त दिसत आहे. जाबिर मोतीवाला दाऊदच्या कराची येथील क्लिफंटन हाऊसच्या शेजारी राहतो आणि त्याचे दाऊदची पत्नी मेहजबीन आणि मुलगा मोईन नवाज याच्याशी पारिवारीक संबंध आहेत.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार जाबिर मोतीवाला हा दाऊदचा खास आहे. त्याच्याकडे दाऊद आणि डी गॅंगच्या नेटवर्कविषयी माहीती आहे. अशावेळी भारतीय यंत्रणा जाबिर मोतीवालाच्या डी गॅंग कनेक्शन संदर्भात एफबीआयला संपर्क करण्याच्या तयारीत आहे. दाऊदचे डी गॅंग नेटवर्क आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयमध्ये साटेलोटे असल्याची माहिती भारताकडे आहे. मोतीवाला हा डी नेटवर्कचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन संभाळतो. तसेच अमेरिकेत तो नशेच्या पदार्थांची तस्करी करतो. काळ्या पैशाला सफेद बनवण्याच्या व्यवसायात देखील तो सहभागी आहे. मोतीलालला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी एफबीआयने हिरोईनचा सौदा केला होता. तसेच मनी लॉंड्रींगद्वारे त्याच्याकडे मदत देखील मागितली होती. मोतीवाला हा अनेकदा पाकिस्तानात जाऊन दाऊदशी चर्चा करत असल्याचे अमेरिकन वकीलांनी न्यायालयात सांगितले आहे.