आसाममध्ये विषारी दारूने घेतला ८० जणांचा बळी
२००हून अधिक जणांना विषवाधा
आसाम : आसाममध्ये गोलाघाट जिल्ह्यात गुरूवारी विषारी दारूने अनेक जणांचा मृत्यू झाला होता. विषारी दारूने मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा ८० वर पोहचला आहे. विषारी दारूने आतापर्यंत २००हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व यांनी याबाबत माहिती दिली.
विषारी दारू पिऊन विषबाधा झाल्याने मृतांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. विषाबाधा झाल्याने रूग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. १४२ जणांना जोरहाट जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या रूग्णांमध्ये ३६ महिलांचा समावेश आहे.
गोलाघाटमधील सरकारी रूग्णालयाचे डॉक्टर दिलीप राजवंशी यांनी एकदिवसापूर्वीच याच भागातील ४ जणांचा विषारी दारूने मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर आता विषारी दारूने ८० जणांचा बळी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाकडून विषारी दारूप्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले असून दारूचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.