नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत शनिवारी दिल्लीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. जेणेकरून काँग्रेसच्या दिल्लीतील प्रस्थापितांच्या वर्तुळाने त्यांच्याच पसंतीचे नाव पुढे रेटू नये, असा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि मुकुल वासनिक यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, आजच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यकारिणीचे सदस्य सोडून इतरांच्या मताचाही विचार केला जाणार का, याविषयी अद्याप अनिश्चितता आहे. 


दोन दशकांनंतर प्रथमच गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनाच काँग्रेसचा नव्या अध्यक्ष कोण असेल, याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. 








मात्र, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष दलित असावा, अशा ज्येष्ठ नेत्यांचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळेच मुकूल वासनिक आणि मल्लिकार्जुन खरगे यांची नावे आघाडीवर आहेत. खरगे गेल्या लोकसभेत काँग्रेसचे सभागृह नेते होते. तर मुकुल वासनिक यांना काँग्रेसमधील संघटनात्मक कामाचा अनुभव असल्यामुळे ते राष्ट्रीय सरचिटणीसाच्या पदापर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय, दलित महिला नेत्याकडेही अध्यक्षपद देण्याचा पर्याय काँग्रेसमध्ये चर्चिला जात आहे.



लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर अनेकांनी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. त्यामुळे तीन महिने उलटूनही पक्षाला नवा अध्यक्ष शोधता आलेला नाही.