राहुल गांधींविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल, RSS संबंधित वक्तव्याशी आहे संबंध
Defamation case against Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला (Defamation Case) दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) कौरवांशी (Kaurava) तुलना केली होती. या वक्तव्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
Defamation case against Rahul Gandhi: मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीमुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी अजून वाढताना दिसत आहे. सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकशाही सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. दरम्यान, सूरत कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधीविरोधात आणखी खटले दाखल होत आहेत. एकीकडे नीरव मोदींनी युकेमधील कोर्टात राहुल गांधी यांना खेचण्याचा इशारा दिलेला असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी केलेल्या एका वक्ततव्यामुळे त्यांना आणखी एका खटल्याला सामोरं जावं लागणार आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी (Rashtriya Swayamsevak Sangh) केलेल्या विधानावरुन हा खटला दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्ता कमल भादुरिया याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे उत्तऱाखंडमधील हरिद्धार कोर्टात वकील अरुण भादुरिया यांनी हा खटला दाखल केला आहे.
हरियाणाच्या अंबाला येथे भारत जोडो यात्रेनंतर रस्त्याशेजारी एका बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी, आरएसएसचे सदस्य हे 21 व्या शतकातील कौरव असल्याचं म्हटलं होतं. "कौरव कोण होते? मी आधी तुम्हाला 21 व्या शतकातील कौरवांबद्दल सांगतो. ते खाकी हाफ पँट घालतात, हातात काठी ठेवतात आणि शाखेत बसतात. देशातील 20 ते 30 लाख लोक कौरवांच्या पाठीशी आहेत," असं सांगत राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला होता. दरम्यान या खटल्याची सुनावणी 12 एप्रिलला होणार आहे.
गेल्या महिन्यात राहुल गांदी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांच्या जेलची शिक्षा सुनावली. नंतर त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. त्यांच्याकडे वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा आहे. राहुल गांधी यांनी 'सर्व चोरांचं आडनाव मोदी आहे' असं विधान केलं होतं. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर नियमाप्रमाणे लोकशाही सचिवालयाने त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली आहे. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून भाजपावर निशाणा साधत आहे.
ललित मोदी युकेत दाखल करणार खटला
ललित मोदी यांनी ट्विट करत राहुल गांधींविरोधात खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला कोणत्याही आरोपात दोषी ठरवलेलं नसतानाही फरार म्हणून संबोधत असल्याने ललित मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. "आता सर्वसामान्यही राहुल गांधी उर्फ पप्पू म्हणत असून, विरोधकांना कोणतंही काम नाही किंवा त्यांच्याकडे चुकीची माहिती असून, द्वेष पसरवत असल्याचं दिसत आहे. मी आता राहुल गांधींना युकेमधील कोर्टात खेचण्याचं ठरवलं आहे. त्यांना आता ठोस पुरावा द्यावा लागणार आहे. आपली मुर्खात गणना करण्यासाठी मी त्यांची वाट पाहत आहे," असं ट्वीट ललित मोदींनी केलं आहे.