पणजी: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नौदलाच्या पश्चिमी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. गोव्याच्या किनाऱ्यालगत उभ्या असणाऱ्या INS विक्रमादित्य या युद्धनौकेवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी नौदलाच्या पश्चिमी विभागाच्या ताकदीचे वर्णन करताना म्हटले की, मी नौदलातील व्यावसायिकता आणि निष्ठा पाहून खूपच प्रभावित झालो आहे. त्यामुळे देश सुरक्षित हातांमध्ये असल्याची खात्री मला पटल्याचे त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजनाथ सिंह यांचा INS विक्रमादित्य युद्धनौकेवरील यावेळचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यामध्ये राजनाथ सिंह मध्यम मशीन बंदूक(एम एम जी) चालवताना दिसत आहेत. 


काही दिवसांपूर्वीच राजनाथ सिंह यांनी स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून सफर केली होती. तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले. जवळपास अर्धा तासांचा कालावधी राजनाथसिंह यांनी तेजस या विमानात व्यतीत केला होता. 


यानंतर राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, मला तेजस विमानाचा प्रवास अनुभवण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी एक विशेष अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले होते.