दिल्ली एम्सच्या हॉस्पिटलवर सर्वात मोठा Cyber Attack, वाजपेयी-सोनिया गांधींसह चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला
AIIMS च्या संगणक सिस्टममधून (Computer System) चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला, दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल
Aiims Cyber Attack : आता बातमी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या हॅकिंगची. दिल्ली एम्सच्या (AIIMS) हॉस्पिटलवर सर्वात मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झालाय. एम्सच्या संगणक सिस्टममधून (Computer System) चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला गेलाय. एम्समध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. ओपीडीसह सर्व ठिकाणी संगणकाशिवाय कामं सुरु आहेत. आठ वर्षांपूर्वी एम्समधील सर्व कारभार हा डिजीटल (Digital) करण्यात आला होता. तेव्हापासून या हॉस्पिटलमध्ये माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती तसंच सोनिया गांधींसह अनेक व्हिव्हिआयपी लोकांवर उपचार झाले आहेत.
त्यामुळे या सर्वांचा पर्सनल डेटा चोरीला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तर सीबीआय, आयबी, डीआरडीओ, एनआयसी आणि दिल्ली पोलिस अशा विविध यंत्रणा या सायबर हल्ल्याचा तपास करतायत. एम्स ही देशातील सर्वात मोठी आरोग्यसेवा संस्था आहे. परदेशातूनही या रुग्णालयात उपचारांसाठी अनेक रुग्ण येतात. सायबर हल्ल्यानंतर एम्समधील सर्व्हर डाऊन होता. या सर्व्हरमध्ये अनेक व्हिआयपी रुग्णांचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत. सायबर हल्ल्यामुळे ही सगळी माहिती बाहेर जाण्याचा धोका आहे.
दिल्ली पोलिसांच्या IFSO पथकाने याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एम्सच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी तपास सुरु केला आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला. एम्सने नोटीस जारी करत डिजीटल सेवा बंद असल्याची माहिती दिली.
याप्रकरणी लॉ इन्फोर्समेंट अथॉरिटीकडून तपास केला जात आहे. भविष्यात असे सायबर हल्ले होऊ नयेत यासाठी काय उपाययोजना करता येतील यावरही विचार केला जात आहे.