नवी दिल्ली : दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, दिवाळीच्या सणात काही लोकांनी जाणूनबुजून लोकांना फटाके फोडण्यास सांगितले. फटाके फोडल्याने प्रदूषण वाढतं याकडे लक्ष देण्यात आलं नाही. दीपोत्सवात लोकांना फटाके फोडण्याचा सल्ला भाजप देत असल्याचा आरोप गोपाल राय यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंदी असूनही दिवाळीत फटाके फटाके फोडण्याच्या घटनांमुळे राजधानीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे असा आरोप गोपाल राय यांनी केला आहे.  मी त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी फटाके फोडले नाहीत, पण काही लोक मुद्दाम फटाके फोडत आहेत. भाजप त्यांच्याकडून हे करवून घेत आहे. दिल्लीत फटाके फोडण्याच्या तीन हजाराहून अधिक घटना घडल्या आहेत, त्याचा परिणाम दिल्लीत दिसून येत आहे. 


दिवाळीच्या एक दिवस आधी बुधवारी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी इतर वर्षांच्या तुलनेत खूपच कमी होती. त्यामुळे यंदा प्रदूषणाची पातळी इतर वर्षांच्या तुलनेत कमी असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दिवाळीच्या एका दिवसानंतर दिल्लीतील प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा उच्चांकावर पोहोचली आहे.


सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, दिल्लीतील AQI बुधवारी 531 इतका होता, जो गंभीर श्रेणीत येतो. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेची खालावलेली पातळी पाहता आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यामुळे लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: ज्यांना श्वसनाचा त्रास आहे, त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.