लॉकडाऊन : ६ वर्षात पहिल्यांंदा दिल्ली-मुंबईने घेतला इतका मोकळा श्वास
लॉकडाऊनमुळे देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रदुषणाचं प्रमाण घटलं
मुंबई : कोरोना (Coroanvirus)विषाणूचा कहर सध्या अनेक देशांमध्ये सुरु आहे. भारतात देखील खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदींनी जाहीर केला आहे. लोकं आपल्या घरातच आहेत. अनेक रस्ते रिकामे आहेत. ऑफीस बंद असल्याने लोकं घरूनच काम करत आहेत. तर काही जण कर्फ्यूमुळे व्यवसाय बंद ठेवून घरातच थांबले आहेत. पण यामुळे दिल्लीतील वायू प्रदुषण देखील कमी झालं आहे. देशातील एकूण १०४ शहरांमधील वायु प्रदुषण कमी झालं आहे. प्रदुषणात जवळपास २५ टक्के घट पाहायला मिळाली. २२ मार्चला जनता कर्फ्यूपासून प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे.
शुक्रवारी दिल्लीत वायू प्रदुषण खूप कमी नोंदवलं गेलं. त्यामुळे दिल्लीने मोकळा श्वास घेतला आहे. वायू प्रदुषण कमी झाल्यामुळे ढग आता निळे दिसू लागले आहेत. लॉकडाऊनमुळे प्रदुषणाला ही ब्रेक लागला आहे.
दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरात वायू प्रदुषण खूप कमी झालं आहे. गाड्या रस्त्यांवर येत नसल्याने गाड्यांचा धूर कमी झाला आहे. रस्त्यावरची धुळ उडणं ही कमी झालं आहे.
जगातील अनेक देशामध्ये इतकं कमी वायू प्रदुर्षण होत नाही. २०१४ नंतर येथील हवेची शुद्धता एक्यूआय ५० पर्यंत पोहोचली आहे. ६ वर्षात पहिल्यांदा दिल्लीने शुद्ध हवेत मोकळा श्वास घेतला आहे.
दुसरीकडे मुंबईतील हवेचं प्रदुषण समाधानकारक आहे. मुंबईत शुक्रवारी वायुची शुद्धता एक्यूआय ६६ नोंदवली गेली. मार्च २०१९ मध्ये हवा एक्यूआय १५३ होती.
देशातील हवा जर शुद्ध राहिली तर रोगप्रतिकार क्षमता देखील वाढते. ज्यामुळे लोकांना कोरोना विरोधात लढण्यासाठी आणखी ताकद येईल.