नवी दिल्ली : बिर्याणी विधानासंबंधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केजरीवाल शाहीनबाग आंदोलकांना बिर्याणी खाऊ घालत असल्याचे विधान योगी आदित्यनाथ यांनी १ फेब्रुवारीला दिल्लीतल्या करावल नगरमधल्या निवडणूक प्रचारसभेत केले होते. त्याविरोधात आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरुन आयोगाने ही नोटीस पाठवली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान, निवडणूक आयोगाने डीसीपी (DCP) राजेश देव यांनाही चांगलाच दणका दिला आहे. मीडियापासून दूर राहण्याचे सक्त आदेश देताना डीसीपी क्राइम राजेश देव यांना इशारा दिला आहे. त्यांना हटविण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टीचे  (AAP) कार्यकर्ते म्हणून डीसीपी राजेश देव यांनी कपिल गुर्जर यांचे वर्णन केले होते. डीसीपी राजेश देव यांना निवडणूक विषयी कोणतेही काम देऊ नये, असे आपल्या आदेशात निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांना निर्देश दिले आहेत. आता योगी आदित्यनाथ यांना वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस  जारी केली आहे. त्याधी भाजपच्या दोन नेत्यांना तंबी दिली होती.


दिल्लीत सत्ताधारी 'आप'ला शह देण्यासाठी भाजपने आक्रमकता अधिक दाखवली आहे.  मात्र, हा आक्रमकपणा भाजपलाच भोवला आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांना प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा बंदी घातली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हणणे वर्मा यांना भोवले आहे. 



निवडणूक आयोगाने प्रचार करण्यास खासदार परवेश वर्मा यांच्यावर २४ तासांची बंदी घातली आहे. याआधी गेल्याच आठवड्यात निवडणूक आयोगानेनं वर्मा यांना प्रचार करण्यास ९६ तासांची बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या भाजपच्या  नेत्यांवर प्रचारबंदीची कारवाई केली होती. यात केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर ७२ तासांची बंदी घातली होती. तरीही पुन्हा वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. त्यांनी त्यांना दहशतवादीच म्हटले.