नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. निकाल पाहता अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. या निकालामुळे आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेच आनंदीत आहेत. तर विरोधी पक्षही आनंद व्यक्त करीत आहेत. विरोधी पक्षांसाठी भाजपचा पराभव हा आम आदमी पक्षाच्या विजयापेक्षा जास्त आनंदायी आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केजरीवाल यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करती पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे आता भाजपला यापुढे कोणतीह 'बाग' आठवणार नाही, असा जोरदार टोला लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले. अखिलेश यादव म्हणाले, "मी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करतो. द्वेष, फसवणूक आणि विनाशाचे राजकारण नाकारल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचेही आभार मानतो. या निवडणुकीनंतर भाजपला कुठलीही बाग आठवणार नाही. 


दिल्लीच्या निकालाचा संदेश देशभर जाईल. देशातील जनता पुन्हा एकदा शेतकरी, गरीब, तरुण, विकास आणि समृद्धीला मतदान करेल. भाजप द्वेषाचे राजकारण बर्‍याच काळापासून करीत आहे, त्यात ते अपयशी ठरतील, असे अखिलेश यादव म्हणालेत. 


दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रवेश वर्मा म्हणालेत, आम्ही हा निकाल स्विकारला आहे. आम्ही अजून मेहनत करू आणि पुढील निवडणुकीत चांगले यश नक्कीच मिळवू. ही निवडणूक शिक्षण आणि विकासाच्या मुद्यावर घेण्यात आली असती तर शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया पटपडगंजमध्ये मागे पडले नसते.