दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये (Tihar Jail) आत्मसमर्पण करावं लागणार आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केली होता. त्यांचा जामीन 2 जूनला संपत असून, रविवारी आत्मसमर्पण करावं लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरविंद केजरीवाल यांनी प्रकृती ठीक नसल्याने अंतरिम जामीन 7 दिवसांसाठी वाढवण्याची मागणी केली होती. शनिवारी कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली. ईडीने अरविंद केजरीवाल यांचा जामीन कालावधी वाढवण्याला विरोध केला आहे. कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या वतीने एन हरिहरन आणि ईडीच्या वतीने ASG एसव्ही राजू यांनी युक्तिवाद केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुनावणीसाठी ऑनलाइन हजर होते. यावेळी त्यांना युक्तिवाद करताना सांगितलं की, काल अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपण 2 जूनला आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितलं आहे. आपण कोर्टाच्या आदेशाची वाट पाहणार आहोत असं ते म्हणाले नव्हते. अशी विधानं करुन ते कोर्टाची दिशाभूल करत आहेत. 


दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 5 जूनला अंतिम निकाल दिला जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडताना एन हरिहरन यांनी म्हटलं होतं की, "ईडीला जी व्यक्ती आजारी आहे किंवा ज्याची प्रकृती खराब आहे त्याला कोणतेही उपचार मिळणार नाहीत असं सुचवायचं आहे का? कलम 21 अंतर्गत आम्हाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला जामीन अर्ज दाखल करण्याची सूट दिली होती. त्याच आधारे आम्ही नियमित आणि अंतरिम जामीन मागितला आहे. अरविंद केजरीवाल आपल्या प्रकृतीमुळे नियमित नव्हे तर अंतरिम जामीनाची मागणी केली आहे. 1994 पासून ते डायबेटिजचे पेशंट आहेत. त्यांना रोज इंसुलिन घ्यावं लागत आहे".