आधी मारून टाकलं, मग कपडे टाकून... दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या
Delhi Crime : दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी त्रास देणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणाची मृतदेह गवताने जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.
Delhi Crime : राजधानी दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी एका 25 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता या मुलांनी कपडे आणि गवताच्या मदतीने तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तिन्ही मुले संशयितरित्या फिरत असताना आढल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
दक्षिण पूर्व दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी खळबळजनक कृत्य केलं आहे. तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. यानंतर मृतदेह कपडे आणि गवताने जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिघांनाही पकडले असता, एकाने असे भयानक पाऊल का उचलले याचं कारण सांगितले आहे. आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी मुलांनी हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे. एका अल्पवयीन मुलाने त्याच्या दोन साथीदारांसह 25 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर कोरडे गवत आणि कापडाच्या सहाय्याने त्याचा मृतदेह जाळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
23 डिसेंबर रोजी रात्री 9:30 च्या सुमारास गस्तीवर असलेल्या निजामुद्दीन पोलिसांना तीन अल्पवयीन मुले संशयास्पद स्थितीत फिरताना दिसली. यावरून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यावेळी तिघांचे वय 16 वर्षे, 16 वर्षे आणि 17 वर्षे असल्याचे समोर आले. तिघांची अस्वस्थता पाहून पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना एवढ्या रात्री फिरण्याचे कारण विचारलं. त्यावर त्यातील एका मुलाने आपण आझाद नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर तिघांच्या सांगण्यानुसार पोलिसांचे पथक तातडीने खुसरो पार्क येथे पोहोचले. पोलिसांना तिथे एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
यानंतर पोलिसांनी तिघांचीही पुन्हा कसून चौकशी केली. त्यावर त्यांनी आपण निजामुद्दीन बस्ती येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले. या तिघांपैकी 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने सांगितले की, आझादने माचे अनेकवेळा शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरून मित्रांसोबत मिळून आधी आझादची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी कपडे व गवतासह त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी रविवारी सांगितले की, "मृत तरुण एका आरोपीसोबत अनेकदा व्यभिचार करत असे. याला कंटाळून आरोपीने त्याच्या दोन मित्रांसह त्याच्या हत्येचा कट रचला. हे तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. 23 डिसेंबरच्या रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही 16 ते 17 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांना पकडले."
दरम्यान, याप्रकरणी खून आणि गुन्ह्याचे पुरावे लपवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. "आम्ही शस्त्र, दगड आणि काठी जप्त केली आहे. हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्यातही मृत व्यक्तीबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. या अधिक प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच मुलांवर बाल न्याय मंडळाच्या नियमांनुसार कारवाई केली जात आहे,'' असे पोलिसांनी सांगितले.