Delhi Crime : लंडनमध्ये नोकरी लागल्याचा आनंद क्षणात विरला... भरधाव कारने तरुणाला उडवले
Delhi Crime : दिल्लीत मुलासोबत राहावं अस त्याच्या वडिलांना वाटत होतं. मात्र त्यांची इच्छा शेवटी अपूर्णच राहिली. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियांचा आधार गेला आहे
Delhi Hit and Run : मंगळवारी रात्री दिल्लीत (Delhi Crime News) हिट अँड रनचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. वेगात असलेल्या कारच्या अपघातानंतर उच्चशिक्षित तरुणाला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीच्या दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील आयआयटीजवळ (IIT) रात्री भरधाव कारने धडक दिल्याने पीएचडीचा विद्यार्थी अश्रफ नवाज खान याचा मृत्यू झाला. अश्रफच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर आरोपीने धडक बसलेले वाहन तिथेच टाकून पळ काढला.
मंगळवारी रात्री अश्रफ आपल्या मित्रासह एका रेस्टॉरंटमधून जेवण करुन बाहेर पडला होता. त्यावेळी रस्ता ओलांडताना अश्रफ आणि त्याच्या मित्राला एका भरधाव कारने धडक दिली. यानंतर दोघांनाही सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर अश्रफचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्राला पुढील उपचारांसाठी साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीच्या चालकाने दोघांना धडक दिल्यानंतर गाडी तिथेच टाकून पळ काढला. कारचा चालक अविहंत शेरावत (31) असून तो महिपालपूरचा रहिवासी आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अविहंतला अटक केली आहे.
अश्रफ खान हा बिहारच्या सिवानचा रहिवासी होता. अश्रफ आयआयटीमधून टेक्सटाईल आणि फायबर इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करत होता आणि वसतिगृहात राहत होता. अश्रफची इंग्लंडमधील एका विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपसाठी निवड झाली होती आणि तो फेब्रुवारीमध्ये तिथे जाणार होता. यामुळे आनंदात असलेल्या अश्रफने बुधवारी मित्रांसाठी एक पार्टीदेखील ठेवली होती. मात्र त्याच्या मित्रांना अश्रफचे पार्थिव घ्यायला रुग्णालयात जावे लागले. अश्रफच्या मृत्यूनंतर कुटुंबासह मित्रपरिवारावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबाचा आधारच गेला
अश्रफच्या वडिलांना नुकतेच ब्रेन हॅमरेज झाल्याचे त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितले. त्याच्या आईला हृदयाशी संबधित आजार आहे. चार मुलींमध्ये तो एकुलता एक मुलगा होता. अश्रफचे वडील शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलाला आयआयटीमध्ये पाठवण्यासाठी खूप कष्ट केले होते. त्याच्या वडिलांना अश्रफसोबत दिल्लीत राहायचे होते. मात्र त्याच्या वडिलांची इच्छा अपूर्णच राहिली. अश्रफच्या मृत्यूने खान कुटुंबियांचा मोठा आधार निघून गेला आहे.