Crime News : आपल्या  वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने भीषण कट रचला. सोशल मीडियावर (Social Media) ओळख करत आरोपी तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण आरोपीला न मारता दुसऱ्याच तरुणीची हत्या केली. एखाद्या हिंदी सिनेमातील कथेप्रमाणे असलेल्या या घटनेने पोलीसही हैराण झाले आहेत. दिल्लीतल्या नोएडा (Delhi Noida) इथल्या बिसरख इथली ही धक्कादायक घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण?
या भीषण हत्याकांडांची मास्टरमाईंड (mastermind) पायल नावाची तरुणी आहे. काही महिन्यांपूर्वी पायलच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून पायलने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार केला. यासाठी तिने एक सूनियोजित कट आखला. सर्वात आधी तिने फेसबूकवर आरोपी अजय नावाच्या तरुणाला शोधून काढलं. त्याच्याशी फेसबूकवर मैत्री केली आणि दोघांमध्य हळूहळू बातचित सुरु झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, अजय पायलच्या प्रेमात पडला. 


पायलने अजयला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं
पायलने अजयला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. अजयही तिच्या प्रेमात इतका वेडा झाला की तिच्यासाठी तो काहीही करण्यास तयार झाला. याच संधीचा पायलने फायदा घेतला. आपल्या सारखीच अंगयष्टी असलेल्या तरुणीचा अजयला शोध घ्यायला सांगितला. त्यानंतर अजयबरोबर मिळून पायलने त्या तरुणीची हत्या केली. तरुणीची ओळख पटू नये यासाठी पायलने आपले कपडे तिला घातले आणि तिच्या चेहऱ्यावर अॅसीड टाकून तिचा चेहरा विद्रूप केला.


पोलिसांना सापडला मृतदेह
यानंतर त्या मुलीचा मृतदेह पायलने अशा ठिकाणी फेकला, जिथे सहज तो कोणाच्याही नजरेस पडू शकेल. अगदी ठरवल्याप्रमाणेच तो मृतदेह काही लोकांच्या नजरेस पडला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. इकडे पायल घरातून बेपत्ता झाल्याने तिचं कुटुंबिय घाबरलं, त्यांनी पोलीस स्थानकात पायल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्याचवेळी पोलिसांना अनोळखी मृतदेह सापडल्याने पोलिसांनी पायलच्या घरच्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवून घेतलं.


कुटुंबियांनी पायल समजून केले अंतिमसंस्कार
मृतदेहाचा चेहरा अॅसीडमुळे विद्रूप झाला होता, पण कपड्यांमुळे पायलचाच मृतदेह असल्याचं कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहाचे अंतिमसंस्कारही उरकले. पण दुसरीकडे ज्या मुलीची हत्या झाली होती, त्या मुलीच्या कुटुंबियांनीही पोलीस तक्रार दाखल केली आणि इथेच पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरु केला. अखेर हत्याप्रकरणाचे धागेदोरे पायलपर्यंत पोहचले आणि पोलिसांनी तिला अटक केली.


असा झाला कटाचा पर्दाफाश
पायलला अटक केल्यानंतर या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. पायलला आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. यासाठी तीने अजयला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, वडिलांनंतर अजयने आपलीही हत्या केली असं भासवण्याचा तिचा प्लान होता. यासाठी फेसबूकवरची चॅटिंग पोलिसांसाठी मोठा पुरावा ठरला असता. पण पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पायल आणि अजयसह चार जणांना अटक केली आहे.