Employee Sent Rs 3 Crore To Wife From Private Company: दिल्लीमधील एक विचित्र आर्थिक घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका खासगी कंपनीमधील कर्मचाऱ्याने कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये फेरफार करुन आपल्या बेरोजगार पत्नीला तब्बल 10 वर्ष कोणतेही काम न करता पगाराचे पैसे मिळवून दिल्याचं समोर आलं आहे. कंपनीच्या रेकॉर्डमध्ये पत्नीच्या नावाचा समावेश करत तिच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा होतील अशी तरतूद या व्यक्तीने केली होती. 2012 पासून आतापर्यंत या व्यक्तीच्या पत्नीच्या बँक खात्यावर बेकायदेशीरपणे 3.6 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्मचाऱ्याने स्वत:चाही पगार वाढल्याचं दाखवत आपल्या खात्यात 60 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती. यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.


कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा संपूर्ण प्रकार मॅनपॉवर ग्रुप सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये घडला आहे. ही कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांना कर्मचारी पुरवठा करण्याबरोबरच मुलाखती घेण्यास मदत करते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅनपॉवर ग्रुपच्या तक्रारीनुसार राधाबल्लव नाथ असं आरोपीचं नाव आहे. राधाबल्लवने 2008 साली सहाय्यक प्रबंधक (अर्थ) म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर त्याचं प्रमोशन झालं आणि तो प्रबंधक (अर्थ) म्हणून काम करु लागला. राधाबल्लवने कंपनीला फसवून आपल्या पत्नीच्या नावाने नियमितपणे कंपनीच्या खात्यातून पैसे जमा होतील यासंदर्भातील योजना तयार केली. कंपनी डेटा प्रायव्हसीला प्राधान्य देत असल्याने केवळ 3 जणांना डेटा हाताळता येतो. यामध्ये निर्देशक (मानव संसाधन म्हणजेच एचआर), मुख्य एचआर आणि राधाबल्लव यांच्याकडे डेटासंदर्भातील माहिती होती.


कसा घातला हा घोळ


राधाबल्लव हा बाहेरील व्हेंडर आणि कंपनीच्या इतर विभागांशी समन्वय साधण्याचं काम करत होता. महिन्याच्या पगाराचं रिजस्टर तयार करणं, भरती झालेले कर्मचारी आणि नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीसंदर्भातील डेटा पगार देणाऱ्या कंपन्यांना पाठवाचं कामही राधाबल्लवचं होतं. या कंपनीकडून नोकरभरती आणि कर्मचारी व्यवस्थापनासंदर्भात सेवा पुरवल्या जत असल्याने अनेक कंपन्या मासिक पगारासंदर्भातील रजिस्टर तयार करुन राधाबल्लवला पाठवायच्या. हा डेटा राधाबल्लव निर्देशकांना (एचआर) पाठवायचा. त्यानंतर हे रजिस्टर अंतिम मंजूरीसाठी सीएचआरओकडे पाठवलं जायचं. सीएचआरओकडून परवानगी मिळल्यानंतर ही माहिती पुन्हा निर्देशकांकडे यायची. ते पुन्हा मंजूर झालेली ही पगाराची यादी राधाबल्लवला पाठवायचे. कोणाचे पगार किती आहेत यासंदर्भातील हे रजिस्टर बँकांना पाठवण्याचं काम राधाबल्लवचं होतं. याच रजिस्टारमध्ये राधाबल्लव स्वत:च्या पत्नीचं नाव टाकायचा असा आरोप कंपनीने केला आहे.


...अन् त्याने दिली कबुली


दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, "राधाबल्लव नाथला 11 डिसेंबर 2022 ला कंपनीने निलंबित केलं. मॅनपॉवर ग्रुपने एक अंतर्गत समितीची स्थापना केली. त्यांनी 8 डिसेंबर 2022 ला घेतलेल्या बैठकीमध्ये आर्थिक व्यवहारांमधील गोंधळ दिसून आला. यासंदर्भातील चौकशीसाठी या समितीने राधाबल्लवला बोलावलं." समितीने कागदोपत्री पुरावे राधाबल्लवसमोर सादर केल्यानंतर त्याने 2012 पासून आपण आर्थिक गैरव्यवहार करत पत्नीच्या खात्यावर बेकायदेशीरपणे 3.6 कोटी रुपये जमा केल्याचं मान्य केलं. 


स्वत:चा पगारही वाढवला


स्वत:चा पगारही आपण वाढवला होता असं राधाबल्लवने कबुल केलं. मागील काही वर्षांमध्ये राधाबल्लवने कंपनीच्या न कळत स्वत:च्या खात्यावर वेतन स्वरुपात 60 लाख रुपये पाठवले. यामुळे कंपनीला एखूण 4.2 कोटींचा तोटा झाला.