दिल्लीत अमित शाहंना भेटल्यावर फडणवीसांनी मोदींच्या भेटीची वेळ मागितली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
नवी दिल्ली : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच आपली संसदीय मंडळावर कोणतीही नियुक्ती झाली नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपमधल्या काही नेत्यांनी काल फडणवीस यांची संसदीय मंडळावर नियुक्ती झाल्याचं ट्विट केलं होतं, पण यानंतर लगेच पक्षाला अशाप्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात आलं होतं.
अमित शाह यांना भेटल्यानंतर आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं फडणवीस म्हणाले. कोरोनासंदर्भात पंतप्रधानांना भेटायचं असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
शाहंसोबतच्या बैठकीत काय झालं?
'अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत साखरेच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. कर्जाचं पुनर्गठन करावं, सॉफ्ट लोन द्यावं. तसंच बेल आऊट पॅकेज द्यावं. एमएसपीमध्ये वाढ करावी, तसंच बफर स्टटक केला पाहिजे, त्यावर व्याज कमी असावे. तसंच निर्यातीसाठी सबसिडी द्यावी,' अशा मागण्या केल्याचं फडणवीस म्हणाले.
इथेनॉलची पॉलिसी आणली आहे. ऑईल कंपन्यांनी १० वर्षांपेक्षा जास्तचे करार करावे. वित्तीय संस्था कारखान्याला मदत करतील, त्यामुळे साखर जास्त झाल्यामुळे भाव पडणार नाहीत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंग नाईक निंबाळकरही सहभागी झाले होते.