दिवाळीआधीच प्रदूषणाने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. दिल्लीमध्ये आणीबाणी स्थिती असून, हवा गुणवत्ता निर्देशांक 'गंभीर' पातळीवर पोहोचला आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, राज्य सरकारला प्राथमिक शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे आज आणि उद्या (3,4 डिसेंबर) सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली सरकारने दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमधील जास्त महत्त्वाची नसणारी बांधकामं तसंच बीएस-3 पेट्रोल, डिझेल कार यांच्यावर बंदी घातली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी वाढत्या प्रदूषणाची दखल घेत घोषणा केली की प्राथमिक शाळा 2 दिवस बंद राहतील. "प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता दिल्लीमधील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा दोन दिवस बंद असतील", असं त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. 



महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व शाळा 3 आणि 4 नोव्हेंबरला ऑनलाइन घेण्यास सांगण्यात आलं आहे. नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे की, सर्व प्री-स्कूल, प्री-प्रायमरी (नर्सरी ते 5 वी पर्यंत) वर्ग 3 आणि 4 तारखेला बंद ठेवण्याचा आदेश दिला जात आहे. शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकवणी द्यावी. तसंच या मुलांच्या पालकांनाही याची सूचना द्यावी. 


दिल्लीतील प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता


दिल्ली-एनसीआरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत पुढील काही दिवसांमध्ये प्रदूषण आणखी वाढू शकतं असा इशारा देण्यात आला आहे. तसंच डॉक्टरांनी श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांसंबंधी चेतावणी दिली आहे.