आत्महत्येचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाला त्यासाठी दोषी ठरवणं ही पत्नीची क्रूरता असल्याचं निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निकाल सुनावताना सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये कुटुंब नेहमीच खोट्या आरोपात आपण दोषी ठरु या भीतीत असतं. सुप्रीम कोर्टानेही वारंवार आत्महत्येची धमकी देणं आणि आत्महत्येचा प्रयत्न करणं ही क्रूरता असल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना दिल्ली हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने यावेळी सांगितलं की, 'या जोडप्याचे वैवाहिक जीवनात सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाले होते. पत्नीने आत्महत्येच्या प्रयत्न करताना मच्छर मारण्याचं औषधही प्यायलं होतं. पण नंतर तिने आपल्याला भाग पाडण्यात आल्याचं सांगत यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला'. 


आपल्याला योग्य आहार दिला जात नसल्याचा महिलेचा आरोप होता. तसंच पतीने टॉनिक असल्याचं सांगत आपल्याला औषध दिल्याचाही तिचा दावा होता असं कोर्टाने सांगितलं. पण जेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा पती कामावर होता हेदेखील तिने स्पष्ट केल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. 


"याचिकाकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर असे वर्तन करणं आणि नंतर पती व त्याच्या कुटुंबीयांवर दोष लावण्याचा प्रयत्न करणं अत्यंत क्रूरतेचं कृत्य आहे. कारण कुटुंबाला खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा सतत धोका होता," असं कोर्टाने म्हटलं आहे. 


"आत्महत्येच्या वारंवार धमक्या देणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणे ही क्रूरता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानेही दुसऱ्या एका प्रकरणात सांगितलं आहे. जर पत्नी आत्महत्या करण्यात यशस्वी झाली तर, गरीब पती कायद्याच्या कचाट्यात कसा अडकतो, ज्यामुळे त्याची विवेकबुद्धी, मन:शांती, करिअर आणि कदाचित त्याचे संपूर्ण आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होईल याची कल्पनाच करता येते. आत्महत्येचा प्रयत्न करण्याची अशी धमकी म्हणजे क्रूरता आहे', असं कोर्टाने सांगितलं.


कोर्टाने पुढे सांगितलं की, "पत्नीला कोणत्याही चुकीच्या गोष्टीविरोधात कायदेशीर आश्रय घेण्याचा अधिकार असला तरी, पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडून हुंड्याची मागणी किंवा क्रूर कृत्ये केल्याचा निराधार आरोप करणे आणि त्यांच्यावर फौजदारी खटला चालवणे हे देखील स्पष्टपणे क्रूर कृत्य आहे".


"आपल्या दोन वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात दांपत्य 10 महिनेही एकत्र राहिलं नाही. पण त्या काळातही खोट्या तक्रारी करण्यात आल्या," असं कोर्टाने नमूद केलं. असं सांगत कोर्टाने हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटाचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.