Delhi Hit and Run: राजधानी दिल्लीत (Delhi) हिट अँड रनची (Hit and Run) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचा चुलत भाऊ जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या सर्वाधिक सुरक्षित व्हीआयपी झोनमध्ये ही घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, कस्तुरबा गांधी मार्ग आणि टॉलस्टॉय मार्ग येथे ही घटना घडली. कारचालकाने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवर दोन तरुण होते. कारने धडक दिल्यानंतर एक तरुण काही फूट दूर फेकला गेला. तर एक तरुण कारच्या टपावर जाऊन आदळला. पण यानंतरही चालकाने कार थांबवली नाही. कारच्या छतावर तरुण जखमी अवस्थेत पडलेला असतानाही चालक कार पळवत होता. 


मोहम्मद बिलाल असं साक्षीदाराचं नाव आहे. ते स्कूटरवरुन प्रवास करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर हा अपघात झाला. यानंतर त्यांनी कारचा पाठलाग करत मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड केला. ते हॉर्न वाजवत, ओरडत चालकाला कार थांबवण्यास सांगत होते. पण तरीही चालकाने कार थांबवली नाही. व्हिडीओत तरुण कारच्या टपावर जखमी अवस्थेत पडल्याचं दिसत आहे. 


जखमी तरुणाला घेऊन जवळपास तीन किमीपर्यंत कार पळवल्यानंतर अखेर दिल्ली गेटजवळ चालकाने कार थांबवली. यानंतर त्याने जखमी व्यक्तीला खाली जमिनीवर फेकलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. यामुळे 30 वर्षीय दिपांशू शर्मा याचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात त्याचा 20 वर्षीय चुलत भाऊ जखमी झाला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गंभीर स्थिती आहे. 


दिल्ली पोलिसांनी याप्ररकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. पण त्याची ओळख जाहीर केलेली नाही. मृत तरुण दिपांशू शर्माचं ज्वेलरी शॉप असून त्याच्या मागे आई-वडील आणि बहिण आहे.


दिपांशू शर्माच्या बहिणीने सांगितलं आहे की "जेव्हा दोन व्यक्तींनी अपघात पाहिला तेव्हा त्यांनी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने कारचा वेग वाढवला. कारच्या टपावर असताना तो जिवंत होता. पण जेव्हा 4 किमीनंतर त्यांनी त्याला जमिनीवर फेकलं तेव्हा डोकं आपटून त्याचा मृत्यू झाला. हे जाणुनबुजून करण्यात आलं". 


या घटनेनंतर दिल्लीत खळबळ उडाली आहे. राजधानी दिल्लीत याआधीही अशा हिट अँड रनच्या घटना घडल्या आहेत. नववर्षाला एका 20 वर्षाच्या तरुणीला कारने 12 किमीपर्यंत फरफटत नेलं होतं. कारने तिच्या स्कूटरला धडक दिल्यानंतर ती कारखाली अडकली होती. पण त्यानंतरही तरुणांनी कार न थांबवता तब्बल 12 किमीपर्यंत तिला फरफटत नेलं होतं.