दिल्ली दुर्घटनेतील अंजलीच्या कुटुंबियांसाठी `पठाण` आला धावून, आर्थिक मदतीचा हात
दिल्ली दुर्घटनेतील अंजली सिंग या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू झाला, कुटुंबातील एकमेक कमवती होती, अशात तिच्या कुटुंबियांच्या मदतीला शाहरुख खान धावून आला आहे
Delhi Horror : दिल्लीतल्या अंजली सिंग मृत्यू प्रकरणाने (Delhi Anjali Singh Accident) संपूर्ण देश हादरला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील कंझावाला भागात स्कूटीवरुन प्रवास करणाऱ्या अंजलीला एका कारने तब्बल 13 किलोमीटर फरफटत नेलं होतं (Kanjhawala Girl Accident). यात अंजलीचा मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की अंजलीच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या. याप्रकरणाचं सीसीटीव्ही (CCTV Footage) समोर आल्यानंतर अंजलीबरोबर त्या रात्री स्कूटीवर एक मैत्रीण असल्याचंही दिसलं होतं. अपघात झाल्यानंतर तिची मैत्रिण निधी (Anajali Freind Nidhi) तिथून निघून गेली होती. आता या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.
शाहरुख खानकडून मदत
अंजली सिंग ही कुटुंबातील एकमेव कमावती मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. अशात तिच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) धावून आला आहे. शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने अंजली सिंगच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. मीर फाऊंडेशनच्यावतीने अंजलीच्या आईच्या उपचाराचा खर्च उचलला जाणार आहे. तसंच अंजलीच्या भाऊ आणि बहिणींनाही आर्थिक मदतीचा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे. (Meer Foundation Help Victim Anjali Family)
शाहरुख खान अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असतो. कोरोना काळात शाहरुख खाने विविध शहरातील गरजवंतांना मदतीचा हात दिला होता. इतकंच काय तर आपल्या मुंबईतील कार्यालयदेखील त्याने कोविड सेंटर (Covid Centre) म्हणून वापरण्यास परवानगी दिली होती. गरजवंतांना मदत करण्यासाठी शाहरुख खानने मीर फाऊंडेशनची स्थापना केली आहे. महिला सबलीकरणासाठी (Women Empowerment) ही संस्था काम करते. याशिवाय आणि लहान मुलांना या संस्थेमार्फत काम केलं जातं. शाहरुख खानचे वडिल मीर ताज मोहम्मद (Meer Taj Mohammad) यांच्या नावावरुन या फाऊंडेशनचं नाव ठेवण्यात आलं आहे.
दिल्ली सरकारकडूनही मदत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांच्यातर्फे मृत अंजली सिंगच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अंजली मृत्यू प्रकरणात दिल्ली सरकारकडून (Delhi Government) वकिलही दिला जाणार आहे. अंजलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे. अंजलीच्या आईच्या उपचारांचा खर्चही दिल्ली सरकार उचलणार आहे.
31 तारखेची ती भयानक रात्र
31 डिसेंबरच्या रात्री अंजली सिंहचा भीषण अपघातात मृत्यू झाला. अंजली सिंह रात्री दीड वाजता आपली मैत्रीण निधीबरोबर स्कूटीवरुन घरी निघाली होती. कंझावाला रोडवर वेगाने येणाऱ्या एका कारने तिच्या स्कूटीला टक्कर मारली. यात निधी बचावली पण तिची मैत्रीण अंजली कारच्या खाली अडकली याच स्थितीत कार चालकाने तिला तब्बल 13 किलोमीटर फरफटत नेलं. याप्रकरणी सर्व सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.