Stole Scooty To Impress Girlfriend: गर्लफ्रेण्डच्या हौसेपोटी Boyfriend थेट Jail मध्ये पोहोचला; मित्रही पोलिसांच्या ताब्यात
Stole Scooty To Impress Girlfriend: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र काही वेळा प्रेमात पडलेल्या व्यक्तींच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की ते थेट कायद्याच्या कचाट्यात अडकतात. असा एक प्रकार नुकताच समोर आलाय.
Stole Scooty To Impress Girlfriend: प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काहीही करु शकते असं म्हटलं जातं. त्यामुळेच प्रेम अंधळं असतं किंवा प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं यासारख्या वाक्यांमधून प्रेमवीरांच्या कोणत्याही कृतीचं समर्थन केल्याचं पहायला मिळतं. मात्र अती उत्साहामध्ये किंवा आपलं इम्प्रेशन पाडण्याच्या नादात अनेकदा प्रेमात पडलेले तरुण-तरुणी असं काही करुन बसतात की त्याचा आयुष्यभर पश्चाताप होतो. असाच काहीसा प्रकार दिल्लीत (Delhi Crime News) समोर आला आहे. येथील द्वारका परिसरामधील 2 मित्रांनी प्रेयसीवर आपली छाप पाडण्यासाठी आणि तिला स्कूटीवरुन फिरवण्यासाठी चक्क स्कूटी चोरली.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी एकाच्या प्रेयसीला स्कूटीवरुन भटकंती करायला फार आवडत असल्याने स्कूटी चोरीचा प्लॅन या दोघांनी तयार केला. प्रेयसीवर छाप पाडण्याच्या दृष्टीने दोघांनी द्वारकेमधील स्कूटी चोरण्याचा कट रचला. या दोघांचा कट यशस्वीही झाला. मात्र हे दोघेही दिल्ली पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींपैकी एकाचं नाव गोलू कुमार असून दुसऱ्याचं नाव मोहम्मद इरफान असं आहे. दोघेही बिंदापूर आणि सीतापुरीचे रहिवाशी असून चांगले मित्र असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
थेट तिहार जेलमध्ये
दिल्ली पोलिसांच्या वाहनचोरीविरोधी पथकाने गोलू आणि मोहम्मदला अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी 2 स्कूटी जप्त केल्या आहेत. या दोघांनाही अटक करुन त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांना अटक करण्यासाठी ट्रॅप तयार केला होता. यासंदर्भातील सविस्तर माहिती द्वारका येथील पोलीस उपायुक्त एम. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
ट्रॅप रचला अन्...
एकामागोमाग एक 2 स्कूटी चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्यानंतर वाहनचोरीविरोधी पथकाकडे या प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला. त्यानंतर या पथकाने ज्या ठिकाणाहून स्कूटी चोरीला गेल्या आहेत तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या तपासणीमध्ये स्कूटी चोरणारे 2 चोर कोण आहेत हे दिसून आलं. त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या दोन संक्षयित आरोपींची माहिती या पथकाने काढली. त्यानुसार ट्रॅप रचून या दोघांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीला गेलेल्या 2 स्कूटी जप्त केल्या. आता या दोघांनी इतरही ठिकाणी चोरी आहे की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.