नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो. हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ आहे. आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि आम्ही तो करू, अशा भावना यावेळी प्रियंका गांधी व्यक्त केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१३ पूर्वी शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दिल्लीवर सलग १५ वर्षे राज्य केले. मात्र, २०१५ आणि यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षावर एकाही जागेवर विजय न मिळण्याची नामुष्की ओढावली आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


तर दुसरीकडे काँग्रेसच्या तुलनेत नवख्या असणाऱ्या 'आप'ने सलग तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने (आप) ७० पैकी ६२ जागा मिळवत दिल्लीत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. तर आक्रमक प्रचाराने दिल्ली दणाणून सोडणाऱ्या भाजपला अवघ्या आठ जागांवरच विजय मिळवता आला. 



दरम्यान, दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षही चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राज्य काँग्रेस कमिटी बंद करण्याची मागणी केली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुडा यांनीही पक्षाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. तर पी.सी. चाको यांनी कालच्या पराभवासाठी चक्क दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांनाच जबाबदार धरले होते. २०१३ मध्ये शीला दीक्षित यांच्याच काळात दिल्लीत काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. त्यावेळी उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेसची संपूर्ण व्होटबँक हिसकावून घेतली. ही व्होटबँक अजूनही 'आप'कडेच असल्याचे पी.सी. चाको यांनी म्हटले होते.