दिल्ली : दिल्लीतल्या हिंसाचाराच्या मुद्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंदांची भेट घेतली. केंद्र सरकार दिल्लीतली हिंसा रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे अमित शाहांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. तर केंद्र सरकारनं राजधर्माचं पालन करावं असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला. या भेटीला विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर नेते उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली हिंसाचारावरून सरकार आणि पोलीस यंत्रणांना फटकारे लगवणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस मुरलीधर यांची एका रात्रीत बदली करण्यात आली आहे. त्यांना पंजाब हरियाणा हायकोर्टात पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारनं त्यांच्या बदलीची अधिसूचना जारी केलीय.मुरलीधर यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. तसंच पोलिसांमुळे परिस्थिती चिघळल्याचा ठपका ठेवला होता. यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केलीय.


नॉर्थ ईस्ट दिल्लीतील हिंसाचारात आत्तापर्यंत ३४ जणांचा बळी गेलाय तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. हिंसाचारग्रस्त भाहात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलंय. दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आत्तापर्यंत १८ गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर १०६ उपद्रवी लोकांना अटक करण्यात आलीय. प्राथमिक तपासात हिंसाचारात नासिर आणि छेनू गँग सामील असल्याचं समोर आलंय. 



पोलिसांनी १२ हून अधिक जणांना ओळखलंय. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि दिल्लीची जबाबदारी असणाऱ्या अजित डोवाल यांनी आपल्या अहवाल गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवलाय. अजित डोवाल यांनी मौजपूर आणि घोंडाचा दौरा करून स्थानिकांशी बातचीत केलीय. तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रभावित भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली.