नवी दिल्ली : दिल्लीच्या गाझीपूर फूल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी एक बेवारस पिशवी सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बविरोधी पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तपासात पोलिसांना बॅगेतून आयईडी स्फोटकं सापडली. दिल्लीबरोबरच पंजाब आणि जम्मू-काश्मिरमध्येही दशरदवादी कारवाया करण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील गाझीपूर फूल मंडीमध्ये एक बेवारस बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली.  याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर रिकामा केला. 


घटनेचे गांभीर्य पाहून एनएसजी घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर जेसीबी मागवण्यात आला. परिसरात एक खोल खड्डा खोदून बॉम्ब निकामी करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांचं विशेष पथक करत आहे.


दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, बॅगेतून आयईडी स्फोटकं सापडली आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.


श्रीनगरच्या नोहट्टा मार्केटमध्ये सापडली संशयास्पद बॅग 
दरम्यान, जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगरमधील नौहट्टा भागातल्या ख्वाजाबाजार भागात एक संशयास्पद बॅग सापडली. त्यात प्रेशर कुकर आणि काही तारा दिसत होत्या. हा आयईडी असल्याचा संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकाला (बीडीएस) घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. नौहट्टा भागातील ख्वाजाबाजार इथं तारा लावलेला प्रेशर कुकर असलेली एक संशयास्पद पिशवी सापडल्यानंतर दहशत निर्माण झाली होती, या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.


पंजाबमध्येही स्फोटकं सापडली
पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये आरडीएक्स मिळाल्यानंतर आता अमृतसरच्या सीमावर्ती गाव धनोआ कलानमध्येही मोठ्या प्रमाणात आरडीएक्स साठा सापडला आहे. शुक्रवारी सकाळी जप्त करण्यात आलेला ही स्फोटकं पंजाब विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जाणार होता, असं सांगण्यात येत आहे. हा आरडीएक्स गावाच्या मुख्य रस्त्यालगतच्या शेतात लपवून ठेवण्यात आला होता.