नवी दिल्ली : Coronavirus in Delhi :देशाच्या राजधानीत कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता दिल्लीतून वीकेंड कर्फ्यू  (Weekend Curfew) लवकरच हटवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी वीकेंड कर्फ्यू  (Weekend Curfew) हटवण्यासाठी नायब राज्यपालांना शिफारस केली आहे. दिल्लीचे (Delhi)आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीही दिल्लीत कोरोना संसर्गाचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे सांगितले आहे. हे पाहता दिल्लीतून शनिवार आणि रविवारचा कर्फ्यू हटवण्यात येणार आहे.


खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतून वीकेंड कर्फ्यू हटवल्यानंतर, बाजारपेठेतील दुकाने उघडण्यासाठी लागू असलेली विषम-विषम प्रणाली देखील काढून टाकली जाणार आहे. खासगी कार्यालयेही 50 टक्के क्षमतेने सुरु करता येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नायब राज्यपालांना पाठवलेल्या शिफारशीत याबाबत स्पष्ट केले आहे.


दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट


गुरुवारी दिल्लीत कोरोना संसर्गाचे 12 हजार 306 नवीन रुग्ण सापडले होते. 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, 18 हजार 815 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.


गंभीर आजारांची संख्या अधिक 


दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये निश्चितच घट झाली आहे, परंतु मृतांच्या संख्येत सध्या कोणताही दिलासा नाही. मात्र, दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 21.48 टक्के राहिला आहे. दिल्लीतील मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीवरुन डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जे रुग्ण आधीच गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्या मृत्यूत वाढ दिसून येत आहे.


सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 68 हजार 730 आहे. याशिवाय सध्या दिल्लीतील कोविड रुग्णालयांमध्ये 2 हजार 698 रुग्ण दाखल आहेत. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3 लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 703 लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला आहे.


गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 29 हजार 722 ने वाढली आहे. याआधी गुरुवारी (20 जानेवारी) कोविड-19 चे 3 लाख 17 हजार 532 नवीन रुग्ण आढळले होते. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 51 हजार 777 लोक कोविड-19 साथीच्या आजारातून बरे झाले आहेत. मात्र, सक्रिय रुग्णांच्या संख्येत 94 हजार 774 ची वाढ झाली आहे. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 झाली आहे.