नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्येंद्र जैन यांची कोरोना विषाणूची चाचणीही झाली आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल लवकरच येईल. त्यांना सध्या रूग्णालयात ऑक्सिजनच्या  आधारावर अॅडमिट करण्यात आलं आहे.


स्वत: सत्येंद्र जैन यांनीही ट्विटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, तीव्र ताप आणि श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुम्हाला माहिती देत राहिल.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन सत्येंद्र जैन लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. त्यांनी म्हटलं की,' आपल्या आरोग्याची काळजी न घेता, 24 तास सेवेत व्यस्त आहात. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.'



विशेष म्हणजे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकामध्ये ही सहभागी होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत ही सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.


यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांना ताप आणि खोकला याची समस्या होती. पण त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली. अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.


दिल्लीत कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत आणि परिस्थिती अनियंत्रित असल्याचे दिसते आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार दिल्लीत कोरोना विषाणूची एकूण 42829 रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे.