Dentist Rapes Woman Patient By Giving Injection: राजस्थानमधील एका डेंटीस्टने केलेल्या धक्कादायक कृत्याचा भांडाफोड झाला आहे. रुट कॅनल करण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला भूल देऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ या डॉक्टरने काढले. दातांचा इलाज करताना त्रास होऊ नये म्हणून भूल देत असल्याचं सांगून या डॉक्टरने महिलेला बेशुद्ध पाडलं. महिला बेशुद्धावस्थेत असताना डॉक्टरने तिच्याबरोबर अश्लील चाळे केले आणि त्याचं चित्रिकरण आपल्या मोबाईलमध्ये केलं.


मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला अश्लील व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यामधील भीनमाल येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पीडित महिलेला चित्रित केलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळपास वर्षभर हा डॉक्टर तिच्यावर बलात्कार करत होता. एका वर्षात जवळपास 7 वेळा या नराधमाने महिलेवर बलात्कार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने डॉक्टर सुरेश सुंदेशाविरोधात भीनमाल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर उपचार करताना त्रास होऊ नये म्हणून भूल देतो असं सांगून डॉक्टरने मला बेशुद्ध पाडलं. त्यानंतर त्याने माझ्याबरोबर अश्लील चाळे करत त्याचं चित्रिकरण मोबाईलमध्ये करुन मला वेळोवेळी धमकावलं, असं या पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढल्यानंतरपासून तो मला पुढील चेकअपला निवांत वेळ काढून ये असं सांगायचा. रुट कॅनलसाठी वेळ लागतो. गर्दी नसेल तेव्हा तुला बोलवेन, असंही डॉक्टरने सांगितल्याचा दावा महिलेने केले आहे.


कॉल करुन धमकावले


महिलेने तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, उपचारादरम्यान अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अनेकदा बलात्कार केला. अश्लील व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी डॉक्टर वारंवार फोन आणि मेसेज करायचा असंही पीडितेने म्हटलं आहे. बऱ्याच वेळा व्हिडीओ कॉल करुन तो मला धमकावत होता असंही पीडितेने नमूद केलं आहे.


महिलेचा पती घरी नसताना यायचा अन्...


आरोपी या महिलेचा पती घरी कधी असतो आणि कधी नाही याची माहिती तिच्याकडून धमकावून घ्यायचा. महिलेच्या पतीच्या वेळेनुसार तो घरी नसताना डॉक्टर घरी जाऊन या महिलेवर बलात्कार करायचा. पीडित महिलेने अनेकदा डॉक्टरला हे अश्लील व्हिडीओ आणि फोटो डिलीट करण्यास सांगितले. मात्र डॉक्टरने त्यांचाच धाक दाखवत महिलेवर 7 वेळा बलात्कार केला. 


आरोपी ताब्यात


पोलीस उपनिरिक्षक हिंमत चारण यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डॉक्टरविरोधात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलं असून कोर्टाने त्याला कोठडी सुनावली आहे.