गुरमीत राम रहीम याला पळवण्याचा प्लॅन फसला
राम रहीम याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : राम रहीम याला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्याला पळवून नेण्याचा कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरविल्यावर सात जणांनी त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेले पोलीस आणि सुरक्षारक्षकांसोबत या सात जणांची बाचाबाची झाली. त्यानंतर राम रहीमला पळवून नेण्याचा कट फसला.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राम रहीमला पळविण्याचा कट फसल्यानंतर या सात जणांनी फोन करुन हिंसा भडकविण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फोन कॉल्समुळे हिंसाचार अधिक वाढला.
फोन कॉलवर काय म्हटलं?
डेरा समर्थकांना पंचकूला परिसरात एकत्रित होण्यास सांगण्यात आलं. तसेच कुठल्या ठिकाणी काय करायचं आहे हे सुद्धा फोनवरुन सांगण्यात येत होतं. या समर्थकांना न्यायालयाच्या परिसरात येण्यास सांगण्यात आलं होतं. कारण, न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता आणि समर्थक कमी होते. त्यामुळे काही झालं असतं तर समर्थक लवकर पकडले गेले असते.