`फडणवीसांकडून केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत`; भाजप नेत्याचाच गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे.
फडणवीस १५ तास मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ४० हजार कोटी रुपये केंद्राला परत केले आणि मग राजीनामा दिला. महाराष्ट्र विकासआघाडी सत्तेत आली तर विकासासाठी असलेल्या निधीचा गैरवापर होऊ शकतो, असं फडणवीस यांना वाटलं आणि त्यांनी हे पाऊल उचललं, असं हेगडे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी हा ड्रामा कशाला केला? बहुमत नसल्याचं आम्हाला माहिती नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री कसे झाले? प्रत्येक जण असे प्रश्न विचारत आहे, असं वक्तव्य अनंत हेगडे यांनी केलं आहे.
या सगळ्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये निवडणूक असताना मतं मिळवण्यासाठी हेगडे असं वक्तव्य करत आहेत. पैसे पाठवून परत घेण्याची तरतूद कोणत्या नियमात आहे, असं मला वाटत नाही. असं झालं असेल तर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल. भाजपवाले लबाड आहेत, मतं मिळवण्यासाठी अशाप्रकारे बोलतात, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.