अमृतसर: पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसागणिक वाढत असल्याने सरकारला जनसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पण हे भाव सध्या कमी होण्याची शक्यता नाही. कारण भाव कमी होण्यासाठी दिवाळी पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेतील पूरस्थितीमुळे तेल उत्पादनात १३ टक्क्यांनी घट झाल्यामुळे रिफायनरी तेल किंमती वाढल्या असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. जीएसटीच्या दरांमध्ये तेल किमती आणण्याची गरजही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली आहे. 


पेट्रोल आणि डिझेल यांना व्यापार व सेवा कर आणण्याबाबत विचारल्यावर पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, त्यांना जीएसटीच्या कार्यक्षेत्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांसदर्भात सर्व काही पूर्णपणे स्पष्ट असून सरकार त्याचे नियोजन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.